दरवर्षी १० हजार विद्यार्थी करतात दाखल्यात दुरुस्‍ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरवर्षी १० हजार विद्यार्थी करतात दाखल्यात दुरुस्‍ती
दरवर्षी १० हजार विद्यार्थी करतात दाखल्यात दुरुस्‍ती

दरवर्षी १० हजार विद्यार्थी करतात दाखल्यात दुरुस्‍ती

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...
............

दरवर्षी १० हजार विद्यार्थ्यांच्या
दाखल्यात दुरुस्‍ती

पालक, मुख्याध्यापकांचे दुर्लक्ष; माध्यमिक शिक्षण विभागाला मन:स्‍ताप

सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. २८ : पालक व मुख्याध्यापक यांनी बारकाईने मुलांच्या नावातील दुरुस्‍ती, आडनाव, आई-वडिलांचे नाव, जातीचा उल्‍लेख व्यवस्‍थित तपासला नाही, तर ही बाब पुढे मोठी डोकेदुखी ठरते. अशा किरकोळ चुका करून पुन्‍हा पश्‍‍चाताप करणाऱ्या‍ विद्यार्थी व पालकांची संख्या दरवर्षी १० हजार इतकी आहे. दाखल्यातील दुरुस्तीसाठी (ते ही फक्‍त ५ वी ते १० इयत्ता) जिल्‍हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे अक्षरश: अर्जांचा पाऊस पडत आहे. आठवड्याला १५० ते २०० व वर्षाकाठी किमान १० हजार अर्ज हे नावातील दुरुस्‍तीसाठी येत आहेत. यामध्येही सर्वाधिक अर्ज हे विद्यार्थी व त्याचे आई, वडील यांच्या नावातील आणि जन्‍मतारखेतील दुरुस्‍तीसाठी येत असतात.

मुलांची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया, स्‍कॉलरशिप असो की अगदी नोकरीसाठीचा अर्ज, या सर्व ठिकाणी शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी केली जाते. विद्यार्थी १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर या दाखल्याचे महत्त्‍व अधोरेखित होते. या दाखल्यावरील विद्यार्थ्याचे नाव, आई व वडिलांचे नाव, जन्‍मतारीख, जात, जन्‍मस्‍थळ याचा उल्‍लेख असतो. या सर्व नोंदी, काना, मात्रा, वेलांटी, जातीचा सुस्‍पष्‍ट उल्‍लेख हे बारकाईने तपासणे आवश्यक असते. मात्र, बहुतांश पालक व मुख्याध्यापकही ते फारसे गांभीर्याने पाहत नाहीत. पुढे जाऊन या कागदपत्रांची गरज भासते व त्यातील त्रुटी समोर येतात, तेव्‍हा मात्र विद्यार्थी व पालकांची भंबेरी उडल्याशिवाय राहत नाही. दर आठवड्याला अर्जांची निर्गत केली जात आहे. मात्र, अर्ज येण्याचे प्रमाण खूप असल्याने यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे शाळा स्‍तरावरच दाखल्यातील दुरुस्‍ती करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रयत्‍न सुरू आहेत.

....
दाखल्यातील दुरुस्‍तीसाठीची कागदपत्रे

विहीत नमुन्यातील अर्ज, पालकांचा विनंती अर्ज, तहसीलदारांकडील प्रतिज्ञापत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जनरल रजिस्‍टर उतारा, बोनाफाईड सर्टिफिकेट, राजपत्र, रेशनकार्ड झेरॉक्‍स, तहसीलदार किंवा उपजिल्‍हाधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला, ग्रामपंचायतीकडील जन्‍माचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, वंशवळ, दत्तकपत्र, निवडणूक ओळखपत्र,पॅनकार्ड आदी कागदपत्रे असतील तरच दाखल्यात बदल केला जातो.
...

‘विद्यार्थी दाखल्यात किरकोळ चुका असल्याचा फटका अनेक यंत्रणांना बसत आहे. जर शालेयस्‍तरावर या त्रुटी दूर झाल्या तर सर्वांचाच वेळ आणि पैसा वाचणार आहे. यासाठी विद्यार्थ्याचे नाव रजिस्‍टरला नोंद करत असताना आवश्यक दाखल्यांची तपासणी करणे, पालकाचे साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पर्यवेक्षकीय यंत्रणेस शाळा भेटीदरम्यान नाव नोंदणी रजिस्‍टर तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक