गोडसाखर विश्‍लेषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोडसाखर विश्‍लेषण
गोडसाखर विश्‍लेषण

गोडसाखर विश्‍लेषण

sakal_logo
By

‘गोकुळ’मध्ये ठिणगी, ‘गोडसाखरे’त भडका
---
‘राष्ट्रवादी’तील गटबाजी; हसन मुश्रीफ व राजेश पाटील आमने-सामने
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीपेक्षा, आता या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आमदार हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांच्यातील इर्ष्येकडे अधिक लक्ष लागले आहे. गोडसाखर निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’च्या या दोन्ही आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला लागली असून, राजकारणात कसलेला पैलवान बाजी मारणार की नवखा मल्ल वरचढ ठरणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत स्वकियांच्या दगाबाजीमुळेच पत्नीसह चंदगड मतदारसंघातील ‘राष्ट्रवादी’ कार्यकर्त्याचा पराभव झाल्याची सल आमदार राजेश पाटील यांना अजूनही आहे. एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत जाहीर वक्तव्यही केले. दुसरीकडे, चंदगड मतदारसंघात माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विभागणी झाली आहे. कुपेकर गटासह चंदगड मतदारसंघातील ‘राष्ट्रवादी’चे काही कार्यकर्ते मुश्रीफ यांच्याबरोबर आहेत. मजूर फेडरेशन निवडणुकीसह ‘गोडसाखर’च्या वर्षभरातील राजकारणात ‘राष्ट्रवादी’तील ही उभी फूट चव्हाट्यावर आली. दोन्ही आमदारांनी एकमेकांच्या मतदारसंघात परस्पर कार्यक्रमही घेतले. या पार्श्‍वभूमीवर मुश्रीफ व पाटील यांच्यात वाढत चाललेला दुरावा सध्याच्या गोडसाखर निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्यापर्यंत पोचला आहे.
दरम्यान, गोडसाखर निवडणुकीत मुश्रीफ यांनी कुपेकर गटासह भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, काँग्रेस, अप्पी पाटील यांना सोबत घेऊन; तर आमदार पाटील यांनी जनता दल, निवृत्त कामगार संघटना, काँग्रेस युतीची आघाडी रिंगणात उतरविली आहे. या दोन आघाड्यांतील थेट लढतीपेक्षा एकाच पक्षाचे आमदार असलेले मुश्रीफ व पाटील यांच्यातील लढतच प्रतिष्ठेची ठरणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात दोनच आमदार असून, त्यांच्यातही आता गटबाजीचे ग्रहण लागल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. प्रत्यक्ष गोडसाखर निवडणूक मतदानावर या गटबाजीचे पडसाद उमटणारच आहेत, शिवाय आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विधानसभा निवडणुकीतही ही बेदिली पक्षाला अडचणीची ठरणार असल्याची शक्यता राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे.
.....
प्रदेशाध्यक्षांनीही हात टेकले?
आमदार पाटील व कुपेकर यांच्या गटबाजीवर नेसरीतील मेळाव्यात जाहीर वक्तव्य झाल्यावर हा वाद संपवण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. त्यानंतर खुद्द प्रदेशाध्यक्षांनी कुपेकरांच्या बंगल्यात कार्यकर्त्यांची कैफीयत ऐकून घेतली. हा वाद तसाच असताना आता मुश्रीफ व पाटील यांच्यातील दुरावाही वाढत चालला आहे.