१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

इंग्रजी संभाषण ही काळाची गरज
भारतात इंग्रजीचा इतिहास सुमारे २५० वर्षे जुना आहे. मागील एक-दीड दशकात इंग्रजीने वेगाने पाय पसरले. त्याचे साधे कारण जागतिकीकरण आणि इंग्रजी भाषा जास्त देशांत व जास्त लोकांकडून बोलली जाते. त्यामुळे आज इंग्रजी ‘ग्लोबल लँग्वेज’ बनली आहे. आज अशी काही ठिकाणे आहेत, तेथे इंग्रजी बोलणाऱ्यांची आवश्‍यकता आहे. कॉल सेंटर, सॉफ्टवेअर, मार्केटिंग, नेटमार्क, एअरपोर्ट, बँकिंग, प्रवास व यापेक्षा अनेक क्षेत्रे आहेत, तेथे इंग्रजीतील संभाषण पाहून ‘जॉब’ मिळतो. त्यामुळे आज ही क्षेत्रे ‘हॉट जॉब’ म्हणून ओळखली जात आहेत व इथेच आपले करिअर करण्याची संधी मिळते. म्हणून आपल्या मातृभाषेबरोबर इंग्रजीची कास सोडता कामा नये.
रावसाहेब शिरोळे, रुकडी (जि. कोल्हापूर)

सीमाप्रश्‍न म्हणजे ‘धगधगते अग्निकुंड’
महाराष्ट्र व कर्नाटकमधील सीमाप्रश्‍न पाच दशकांहून अधिक काळ रखडला आहे. दोन्ही राज्यांत काही वेळा एकाच पक्षाचे सरकार असतानाही हा प्रश्‍न सुटलेला नाही. सीमाप्रश्‍न सोडविण्यासाठी लढा, आंदोलन, उपोषण यांसह समिती, उपसमिती नेमली. न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात आले. परंतु, प्रश्‍न अद्याप कायम आहे. दुसरीकडे या प्रश्‍नावरून होणाऱ्या राजकीय कुरघोड्या कमी होताना दिसत नाहीत. कर्नाटक सरकारने काही वर्षांपूर्वी तर बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला आहे. एकंदरीत सीमाप्रश्‍न म्हणजे ‘भिजते घोंगडे’ झाले. सीमाभागातील लोक काय-काय याचना करीत असतील, याचा विचार करणारे कोणी आहेत का? असा प्रश्‍न काही वेळा पडतो. १ नोव्हेंबरला सीमा भागातील लोक काळा दिवस साजरा करतात. दुसरीकडे कर्नाटक सरकार आपला स्थापना दिन धूमधडाक्यात साजरा करते. सीमाप्रश्‍न म्हणजे ‘धगधगते अग्निकुंड’च झाले आहे.
नीळकंठ देशिंगकर, मिरज (जि. सांगली)

असा आदर्श घ्यायला हवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर गेली सलग आठ वर्षे ते दिवाळी सण भारतीय सैनिकांबरोबर साजरा करतात. कारगिल, लेह-लडाख, सियाचीन, काश्मीरसारख्या दुर्गम भागात प्रत्यक्ष जाऊन देशाच्या सैनिकांशी संवाद साधून मिठाई देतात, त्यांच्या अडचणी समजून घेऊन विचारपूस करतात. देशांच्या सीमांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मनोबल त्यामुळे वाढते. पंतप्रधान मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यंदा गडचिरोलीत जाऊन पोलिसांबरोबर दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांचा आदर्श घेऊन त्यांनी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. देशाचा किंवा राज्याचा वरिष्ठ नेता जेव्हा सुरक्षा दलांना भेटून त्यांची विचारपूस करीत असतो, तेव्हा निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो.
श्रीधर वष्ट, कोल्हापूर