शायना एन. सी. पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शायना एन. सी. पत्रकार परिषद
शायना एन. सी. पत्रकार परिषद

शायना एन. सी. पत्रकार परिषद

sakal_logo
By

राहुल गांधींनी आधी पक्षाला जोडावे

शायना एन. सी.ः कॉंग्रेस पक्षाची नाव बुडाली


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारताला जोडण्यापेक्षा पक्षाला जोडायचे काम करावे, असा सल्ला भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. कॉंग्रेस पक्षाची नाव बुडाली आहे. अनेक नेत्यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. या पक्षाचा व्हिजन प्लॅन काय आहे? याउलट, भारतीय जनता पक्षाची प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आहे, असेही त्या म्हणाल्या.
शायना म्हणाल्या, ‘मेक इन इंडियाचा विचार करता भारताचा जीडीपी वाढत आहे. लोकांना रोजगार दिला जात आहे. त्यासाठी एखादा प्रकल्प गुजरातेत अगर महाराष्ट्रात झाला तर काय हरकत आहे? एखादा प्रकल्प कोठे उभारायचा हे पक्षाचे नेतृत्त्व नव्हे तर उद्योजक ठरवत असतो. येत्या काळात महाराष्ट्रातही चांगला प्रकल्प उभा करण्याचा आमचा मानस आहे. भाजपचे सदस्य सेवक म्हणून काम करत आहेत. पंतप्रधानांपासून कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाचे ११ कोटी सदस्य आहेत, ही अभिमानाची बाब आहे. या स्थितीत आम्हालाही सक्षम विरोधी पक्ष हवा आहे. मात्र, कॉंग्रेस आता राष्ट्रीय की, प्रादेशिक पक्ष राहिला आहे, याचे उत्तर जनता देईल. भारत जोडो यात्रेचा त्यांना राजनैतिक अधिकार जरूर आहे. मतदार हुशार असून, त्यांना कोण काम करते आणि कोण ड्रामा करते, हे कळते.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘भाजपवर सुडाचे राजकारण करण्याचा आरोप करणाऱ्या गांधी यांच्या पक्षातील तोडफोड आम्ही पाहत आहोत. देशातील कोट्यवधी जनतेपैकी थोडेफार भारत जोडो यात्रेशी जोडले आहेत. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेत कॉंग्रेस, शिवसेना, एनसीपी सहभागी होणार असेल, त्यांचे भविष्य जनताच ठरवेल.’’
पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिक्‍कोडे, जायंट्‌स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गिरीश चितळे उपस्थित होते.
--------------
चौकट

केजरीवाल यांचे
नोटेवर राजकारण
नोटांवर कोणाचा फोटो छापायचा, हे संविधानानुसार ठरते. केजरीवाल यांनी हा मुद्दा उपस्थित करत नोटेवर राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. नोटेवर कोणाचा फोटो राहील, हे जनता ठरवेल. सत्तावीस वर्षांनंतर गुजरातमध्ये भाजपला संधी मिळाली असून, तेथे आता स्थिरता आली आहे. कोणतीही धार्मीक दंगल झालेली नाही. गुजरात प्रगतीच्या वाटेवर आहे, असे शायना यांनी स्पष्ट केले.
--------------
चौकट
दाल मे कुछ काला है...
भाजपकडून ईडी व सीबीआयची भीती दाखवली जात असल्याच्या आरोपाबाबत त्या म्हणाल्या, ‘‘जर कोण चुकीचे काम करत नसेल, तर त्यांना घाबरायचे कारण काय? या संस्थांचा सन्मान करायला हवा. जर तुम्ही तसे करणार नसाल तर ‘दाल मे कुछ काला है,’ असे म्हणायला वाव आहे.’