रस्ते काम बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते काम बैठक
रस्ते काम बैठक

रस्ते काम बैठक

sakal_logo
By

59162
कोल्हापूर ः शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर सोमवारी जाहिर केलेल्या घेरावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बैठक घेतली. यावेळी उपस्थित रिक्षा संघटना, वाहनधारक संघटनांसह कृती समितीचे सदस्य.

रस्तेकामाचे वेळापत्रक मंगळवारी
ःप्रशासन-सर्वपक्षीय कृती समिती बैठक; घेरावाचा निर्णय तात्पुरता स्थगित
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्यामुळे शहरवासियांबरोबरच पर्यटकांतूनही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे सोमवारी (ता.३१) रिक्षा, वाहनधारक संघटनांसह कृती समितीने महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी प्रशासनासह वाहनधारक संघटना, सर्वपक्षीय कृती समिती सदस्यांची संयुक्त बैठक घेतली. शहरातील सर्व रस्त्यांच्या कामाचे वेळापत्रक मंगळवारी (ता. १) प्रसिध्द करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. दरम्यान, महापालिकेला घेरावाचा निर्णय तात्पुरता स्थगित केला असून वेळापत्रकानुसार शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार व चांगली झाली नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन होईल, असे यावेळी कृती समितीने सांगितले.
कृती समितीच्या वतीने ॲड. बाबा इंदूलकर, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, किशोर घाटगे, राजू जाधव, अशोक भंडारे, सुभाष शेटे आदींनी आंदोलनाविषयीची भूमिका मांडली. खराब रस्त्यांमुळे वाहनांबरोबरच वाहनधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्त्यांवर इतका खर्च करूनही रस्ते खराब होतात, खराब रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, महापालिकेचा खडी व डांबर प्रकल्प धूळ खात पडला आहे, वारंवार प्रशासनाचे या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधूनही प्रशासन जागे होत नसल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत शहर अभियंता नेत्रदीप नरनोबत यांनी दिली. शहरातील ६२ रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी साडेआठ कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला असून त्यातून कामांना प्रारंभ झाला आहे. आणखी साठ रस्त्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी कंत्राटदारांची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार या सर्व रस्त्यांची कामे कधी पूर्ण होणार, याचे वेळापत्रक महापालिकेने मंगळवारी (ता.१) सकाळी अकरापर्यंत कृती समितीला द्यावे. वेळापत्रकानुसार व दर्जेदार कामे झाली नाहीत तर आंदोलनाचा मार्ग मोकळा असेल. पण, पुन्हा आंदोलन होणार नाही, याची खबरदारी प्रशासन घेईल, असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितले.
---------------
डांबराचा योग्य वापर नाही...
महापालिकेच्या हद्दीत सातशे ५२ किलोमीटरचे रस्ते आहेत. मात्र, गेली काही महिने सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. तीन महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यांचीही धुळधाण झाली आहे. शाहू नाका ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंतच्या रस्त्यासाठी खर्च केलेले तीन कोटी असोत किंवा पापाची तिकटी ते चप्पल लाईन रस्त्यासाठीही प्रत्येक वर्षी पंधरा ते वीस लाख रूपये खर्च होतात. रस्त्यासाठी योग्य प्रमाणात डांबराचा वापर केला जात नाही. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून झालेली कामेही निकृष्ट झाली असून महापालिकेने कोल्हापूरची बदनामी तत्काळ थांबवावी, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या.
--------------
दुरूस्तीच्या कामाची छायाचित्रे काढा
रस्त्यांच्या कामावर देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही बैठकीत झाली. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे तातडीने सर्व्हेक्षण करावे आणि दुरूस्तीच्या कामाची छायाचित्रे काढून ती प्रसिध्द करावीत. रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासणीसाठी वालचंद महाविद्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयोगशाळेत नमुने पाठवावेत. जुन्या रस्त्यांवर भर टाकण्याऐवजी त्याची खुदाई करून, रस्ते तयार करावेत, पूरबाधित क्षेत्रात कॉंक्रीटचे रस्ते करावेत. त्यानंतर समितीने शहरातील निवृत्त अभियंत्यांची नावे द्यावीत. त्यांच्यावर रस्ते कामावर देखरेख करण्याची जबाबदारी दिल्यास रस्ते अधिक चांगले होतील, असेही जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितले.