...तर जग सुंदर होईल; स्वागत थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर जग सुंदर होईल; स्वागत थोरात
...तर जग सुंदर होईल; स्वागत थोरात

...तर जग सुंदर होईल; स्वागत थोरात

sakal_logo
By

59221
अत्याळ : नेत्रदान चळवळीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात भीमा गुरव या नेत्रदात्याच्या कुटुंबीयांना गौरवपत्र प्रदान करताना स्वागत थोरात. शेजारी स्वरूपा देशपांडे, डॉ. सदानंद पाटणे.

...तर जग सुंदर होईल
स्वागत थोरात; वर्धापनदिनी नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र प्रदान

गडहिंग्लज, ता. ३० : समाजात प्रश्न अनेक आहेत. त्यावर काम करण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपल्याकडे जे आहे त्यातील थोडे दुसऱ्याला देण्याची भूमिका घ्यायला हवी. वेळ आहे त्याने वेळ, पैसा आहे त्याने पैसा, ज्ञान आहे त्याने ज्ञान द्यावे. स्वत:साठी जगताना थोडे दुसऱ्यासाठीही जगावे. असे झाल्यास हे जग सुंदर होईल, असे मत अंधांसाठी कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते स्वागत थोरात यांनी व्यक्त केले.
अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे नेत्रदान चळवळीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी थोरात बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या स्वरुपा देशपांडे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी वर्षभरात नेत्रदान झालेल्या ३२ नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले. लक्ष्मी देवालयाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला.
थोरात म्हणाले, ‘‘आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय मिळालेली आहेत. पण, सर्वच ज्ञानेंद्रियांचा आपण क्षमतेने वापर करीत नाही. दृष्टीचा प्रभाव मोठा असल्याने इतर ज्ञानेंद्रिय कमी पडतात. सर्वच ज्ञानेंद्रियांचा वापर सक्षमतेने करायला हवा. अंध पाहू शकत नाहीत. पण, त्यांना संधी दिली तर ते आपल्या बरोबरीने काम करु शकतात. यातून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.’’
थोरात यांनी १९९३ पासून अंधांसाठी सुरु केलेल्या ब्रेल लिपीतील व अंधांच्या रंगभूमीवरील कामाची चित्रफितीच्या माध्यमातून माहिती दिली. अपूर्व मेघदूतच्या नाट्यप्रयोगातून १७ सामाजिक संस्थांना मदत मिळवून देत अंध व्यक्ती केवळ घेत नाहीत, तर समाजाला देवूही शकतात हे दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सदानंद पाटणे यांचेही भाषण झाले.
अवधूत पाटील यांनी प्रास्ताविकात चळवळीच्या कामाचा आढावा घेतला. अत्याळ, बेळगुंदी, करंबळी, कौलगे, ऐनापूर, हिरलगे, लिंगनूर कसबा नूल, इंचनाळ, भडगाव, उंबरवाडी (ता. गडहिंग्लज), सरोळी, मडिलगे, उत्तूर (ता. आजरा), शेंडूर (ता. निपाणी) या गावासह गडहिंग्लज शहरातील ३२ नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले. प्रा. आशपाक मकानदार यांनी सूत्रसंचालन केले. चळवळीशी जोडलेल्या विविध गावांतील कार्यकर्ते उपस्थित होते.
नेत्रदान चळवळीला दीर्घायुष्य...
स्वागत थोरात म्हणाले, ‘‘वडाच्या वृक्षाची वाढ हळुवार होते. पण, तो वृक्ष दीर्घायुषी असतो. नेत्रदान चळवळही वडासारखी आहे. तिला दीर्घायुष्य मिळणार आहे. आजवरची वाटचाल पाहता चळवळीचा विस्तार वाढणार यात शंकाच नाही.’’