जे राजकारणात तेच विद्यापीठात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जे राजकारणात तेच विद्यापीठात
जे राजकारणात तेच विद्यापीठात

जे राजकारणात तेच विद्यापीठात

sakal_logo
By

सिनेट निवडणुकीत ‘सब घोडे बारा टक्के’

वैचारिक भूमिका विसरत डावे-उजवे एकत्र

ओंकार धर्माधिकारी, सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः राज्याच्या राजकारणात जे घडत आहे, तेच आता विद्यापीठ अधिसभेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. एकमेकांना टोकाचा विरोध करणारे हिंदुत्वावादी आणि साम्यवादी एकत्र आले आहेत, तर देशात सर्वत्र विरोधात असणारे काँग्रेस आणि भाजप विद्यापीठ निवडणुकीत गेल्या पंचवार्षिकप्रमाणे यंदाही एकत्र आले आहेत.
खरेतर विद्यापीठ हे सत्ताकेंद्र नाही. ती एक शैक्षणिक संस्था आहे. विद्यार्थ्यांचे हित जपले जावे यासाठी तेथे अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद अशी व्यवस्था केली आहे. या सर्व ठिकाणी विद्यापीठाचे पदवीधर, प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्थाचालक सदस्य म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून जातात. हे सर्व विद्यापीठाचे संचालन करतात. एका अर्थाने विद्यापीठावर सर्वसामान्यांचेच नियंत्रण असते; पण गेल्या काही वर्षांत विद्यापीठाच्या निवडणुकीला राजकीय स्वरूप आले आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींना आपले कार्यकर्ते इथे सदस्य म्हणून जावेत, असे वाटते. गेल्या निवडणुकीत विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ विकास मंच एकत्र आले. आघाडीचे नेतृत्व डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील करतात. त्यांचे भाऊ सतेज पाटील हे काँग्रेसचे आमदार असून, माजी मंत्री आहेत, तर मुलगा ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांच्या आघाडीत राष्ट्रवादीचे भैया मानेही आहेत, तर विकास मंचमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. या मंचचे नेतृत्व निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे करतात. एका अर्थाने भाजप, काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा मानणारे विद्यापीठ निवडणुकीत एकत्र आले असून, यंदाही ते एकत्र निवडणूक लढवणार आहेत.
.......

शिवसेना-डावे एकत्र
एरवी शिवसेनेला धर्मांध म्हणून संबोधणारे डावे चक्क शिवसेनेबरोबर विद्यापीठाची निवडणूक लढवणार आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ही साम्यवादी विचारांची संघटना शिवसेनेसोबत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आहे, तर पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणारी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांचीही साथ त्यांना मिळाली आहे. या सर्वांनी एकत्र येऊन आता शिव-शाहू आघाडी केली आहे. विद्यापीठातील अधिसभेवर सदस्य होण्यासाठी वैचारिक भूमिका विसरून विरोधकही एकत्र आले आहेत.