पाऊस थांबला, पाणी नियोजनाचे वेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस थांबला, पाणी नियोजनाचे वेध
पाऊस थांबला, पाणी नियोजनाचे वेध

पाऊस थांबला, पाणी नियोजनाचे वेध

sakal_logo
By

59354
जरळी : महापुरात वाहून आलेल्या कचऱ्यामुळे हिरण्यकेशी नदीवरील हा बंधारा असा गच्च झाला आहे. (छायाचित्र : संजय धनगर, जरळी)

पाऊस थांबला, पाणी नियोजनाचे वेध
कचऱ्यामुळे बंधारे गच्च; स्वच्छता, पाणी अडविण्यास तत्काळ सुरुवात हवी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : पावसाळा आणि अवकाळी पावसानेही माघार घेतली असून आता थंडीची चाहूल लागली आहे. दुसऱ्या बाजूला हिरण्यकेशी नदीतील पाणी पातळी खालावू लागली आहे. बंधारेही अजून कचऱ्याने गच्च असून त्याच्या स्वच्छतेनंतर पाणी अडवावे लागणार आहे. पाणी कमी होण्याची गती लक्षात घेता बंधाऱ्यां‍ची स्वच्छता व पाणी अडविण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने तत्काळ सुरु करण्याची गरज व्यक्त होत आहे.
गतवर्षी अवकाळी पाऊस गेल्यानंतर ऑक्टोबर अखेरीस स्वच्छतेचे काम सुरु झाले होते. परंतु यावर्षी अजून कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. आठवडापूर्वी अवकाळी पावसाने जोर धरला होता. यामुळे नदीतील पाण्याची पातळीही वाढली होती. मात्र त्यानंतर आठवड्यापासून थंडीची चाहूल लागली आहे. नदीतील पाणी पातळीही कमी होत आहे. स्वच्छतेलाच अधिक कालावधी लागणार आहे. त्यानंतर बंधार्‍यात लोखंडी अथवा लाकडी फळ्या टाकून पाणी अडवावे लागते. मात्र अद्याप स्वच्छतेलाच प्रारंभ नसल्याने पाणी कधी अडवणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.
पाणी अडविण्याचे काम वेळेत पूर्ण झाले तरच चित्री प्रकल्पातून उन्हाळी पाणी विसर्जनाचे नियोजन चांगले होत असते, हे अलीकडील काही वर्षापासून अनुभवण्यास मिळत आहे. पावसाचे पाणी तीन ते चार मीटरने अडविल्यास चित्रीतील पहिला विसर्ग जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीत जाते. म्हणजेच चित्रीतील पाण्याचे जूनपर्यंत पाच विसर्गांचे नियोजन व्यवस्थित होते. पावसाचे पाणी अडविण्यास उशिर झाल्यास डिसेंबर किंवा जानेवारीतच पाणी चित्रीतून सोडावे लागते. परिणामी ऐन उन्हाळ्यात प्रकल्पाचेही पाणी कमी पडण्याची भिती असते. यामुळे आतापासूनच पावसाचे पाणी अडविण्याचे नियोजन होणे सोयीचे आहे.

चौकट...
गडहिंग्लज पाटबंधारे ‘प्रभारी’वर
गडहिंग्लज पाटबंधारे कार्यालयातील उपअभियंता व शाखा अभियंता ही दोन्ही प्रमुख पदे रिक्त आहेत. शाखा अभियंत्यांचे पद तर वर्षभरापासून रिकामे आहे. या पदाचा कार्यभार आजर्‍याच्या शाखा अभियंत्यांकडे, तर सेवानिवृत्तीने महिन्यापासून रिक्त असलेल्या उपअभियंता पदाची अतिरिक्त सूत्रे चंदगडच्या उपअभियंत्यांकडे आहेत. यामुळे सध्या पाटबंधारेचा कारभार प्रभारींवर असून त्याचा परिणाम कामावरही होत असल्याचे चित्र आहे.