इचलकरंजीतील रस्त्यांची चाळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीतील रस्त्यांची चाळण
इचलकरंजीतील रस्त्यांची चाळण

इचलकरंजीतील रस्त्यांची चाळण

sakal_logo
By

59360
सीईटीपी ते सांगली रोड मार्ग
59361
जने शिवाजीनगर पोलीस ठाणे
59362
शिवतीर्थ परिसर
59358
स्टेशन रोड कमान
59359
उत्तम-प्रकाश चित्रमंदीर (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्र सेवा)

कोट्यवधी खर्चूनही रस्त्यांची दुर्दशाच
इचलकरंजीतील रस्त्यांची चाळण; सर्वत्र खड्डेच खड्डे, अपघातांचे प्रमाण वाढले, गुणवत्तेकडे दुर्लक्ष
इचलकरंजी, ता. ३० : शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांची दिवसेंदिवस चाळण होत चालली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्यानंतरही केवळ गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे काही कालावधीतच रस्त्यांची अशी दूरवस्था पहावयास मिळत आहे. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काय, असा प्रश्न या निमित्तांने समोर येत आहे. तर वाहनधारकांना अशा खराब रस्त्यांतून आपले वाहन घेवून जातांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर गायब झाले असून दगड व खडी वर आली आहे. त्यामुळे दुचाकी वाहने घसरुन अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे.
तत्कालीन पालिकेच्या माध्यमातून शहरातील बहुतांशी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते. तर तत्कालीन फडणवीस शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १०७ कोटींचा निधी दिला होता. त्यामध्ये रस्त्यांसह गटारी व पदपाथ करण्यात आले. यातील अनेक पदपाथ अनावश्यक असल्याच्या तक्रारी यापूर्वीच झाल्या आहेत. तर तांत्रिकदृष्ट्या गटारींचे काम सदोष असल्याचे नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात दिसून आले आहे. अनेक गटारी सुस्थीतीत असतांनाही पाणी रस्त्यावर साचून राहिले होते. परिणामी, त्याची नकळत हानी रस्त्याला पोहचली आहे. अनेक ठिकाणेच डांबर पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. तर त्याठिकाणी खडी वर आली आहे. त्यामुळे असे रस्ते वाहतूकीसाठी धोकादायक बनले आहेत. अनेक ठिकाणी दुचाकी घसरुन अपघात झाल्याचे समोर आले आहे.
वास्तविक रस्ते केल्यानंतर त्याचे किमान सहा महिने एक वर्षासाठीचे उत्तरदायित्व संबंधित मक्तेदाराचे असते. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून करणे आवश्यक असते. पण त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. अलीकडच्या काळात केलेले रस्तेही पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे. गुणवत्तेअभावी रस्त्यांची दूरावस्था झाली असून त्याचा नाहक त्रास वाहनधारकांना बसत आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून असे खड्डे चुकवितांना लहान मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी कधी होणार, असा सवाल वाहनधारकांसह नागरिकांतून उमटत आहे.
-----------
चौकट
जनहित याचिकेनंतरही ढिम्म
विशेष म्हणजे यापूर्वी शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात जनहीत याचिकाही दाखल झाली होती. पण त्यानंतरही याबाबत महापालिका प्रशासनाकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याचे समोर येत आहे. सोशल मिडियातूनही रस्त्यांत पडलेल्या खड्ड्यांबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
----------
रस्ते खोदाईवर कठोर निर्बंध गरजेचे
शहरात आजही कुठे ना कुठे तरी रस्ता खोदाईचे काम सुरु असल्याचे विदारक चित्र दिसते. वास्तविक रस्ते केल्यानंतर खोदाईबाबत कठोर निर्बंध घालणे गरजेचे आहे. पण प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे चांगल्या रस्त्यांची दिवसेंदिवस चाळण होतांना दिसत आहे.