सोने लुटी प्रकरणी दोन कामगार ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोने लुटी प्रकरणी दोन कामगार ताब्यात
सोने लुटी प्रकरणी दोन कामगार ताब्यात

सोने लुटी प्रकरणी दोन कामगार ताब्यात

sakal_logo
By

सराफाला लुटणारे दोघे ताब्यात
तीस लाख जप्त; अन्य तिघांचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः सराफ व्यावसायिकास वाटेत अडवून त्यांच्याकडील ८० लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३० लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या अन्य तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे मात्र समजू शकली नाहीत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी आनंदा मगर (वय ३२ रा. नागाव ता. वाळवा जि. सांगली) हे दिवाळीचे सोने खरेदी कऱण्यासाठी कोल्हापूरला आले होते. त्यांच्या सॅकमध्ये ४० लाख होते, तर गांधीनगर येथील मित्राकडून त्यांनी आणखी ४० लाख घेतले होते. मगर कोल्हापूरला येत असताना मुक्तसैनिक वसाहत परिसरात त्यांना अज्ञात व्यक्तींनी अडविले. आम्ही प्राप्तिकर विभागाचे अधिकारी असून, तुमचे पैसे द्या, अशी बतावणी करून चौघांनी त्यांच्याकडील ८० लाख घेऊन पलायन केले. १७ ऑक्टोबरला हा प्रकार घडला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणने याचा तपास सुरू केला. त्यांना संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पोलिसांनी आज दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३० लाखांची रोकड जप्त केली. तसेच दोघा संशयितांसोबात असणाऱ्या आणखी तिघांचा शोध पोलिस घेत आहेत.

कामगारांनी रचला कट
मगर यांनी गांधीनगरमधील ज्या व्यापाऱ्याच्या दुकानातून रोकड घेतली तेथील कामगारांनी रोकड पाहिली होती. त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने हा कट रचला. अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

रकमेबद्दल संभ्रम
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांनी चोरीची कबुली दिली आहे, मात्र त्यांनी केवळ ३० लाख रोकड चोरल्याचे म्हटले आहे, मात्र फिर्यादीमध्ये ८० लाखांची रोकड नमूद आहे. त्यामुळे नेमकी किती रक्कम चोरीला गेली यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.
---------------------------
रक्कम हवाल्याची असल्याचा संशय
एवढी मोठी रक्कम नेमकी कोणत्या व्यवहारातून आली आहे. तिचा मूळ स्त्रोत कोठे आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. एका व्यावसायिकाची ही रक्कम असल्याचे सांगितले जात असले तरी ही रक्कम हवालाच्या व्यवहारात वापरली जात होती का? याचाही पोलिस तपास करत आहेत.