साखर हंगाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर हंगाम
साखर हंगाम

साखर हंगाम

sakal_logo
By

विभागातील २५ कारखान्यांची धुराडी पेटली
पावसाची उघडीप; कोल्हापुरातील १७, सांगलीतील ८ कारखाने

कोल्हापूर, ता. ३१ ः गेल्या पंधरा दिवसांपासून सतत पडलेल्या धुवाँधार पावसामुळे अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात सापडलेल्या साखर हंगामाला वेग येत आहे. विभागातील २५ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील १७ तर सांगली जिल्ह्यातील आठ कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
यावर्षीचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे शासनाचे आदेश होते. पण त्याच दरम्यान कोल्हापूरसह महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले होते. सलग सहा-सात दिवस झालेल्या पावसाने हंगाम लांबणार, हे निश्‍चित होते. तोंडावर दिवाळी असल्याने तोडणी यंत्रणाही दबकतच जिल्ह्यात दाखल झाली होती. परिमाणी या पावसाचा परिणाम हंगामावर होऊन हंगाम लांबत गेला. दिवाळीपासून अपवाद वगळता पावसाची चांगली उघडीप राहिली आहे. त्यामुळे कारखान्यांनी ऊस तोडणी जोमात सुरू केली आहे. अजूनही काही शेतात पावसाचे पाणी साचले असले तरी रस्त्याकडेचा ऊस तोडून गाळपासाठी नेला जात आहे.
यावर्षीच्या हंगामासाठी १०.२५ रिकव्हरीला प्रतिटन ३०५० रु. दर निश्‍चित केला आहे. यापेक्षा जास्त दर द्यायचा असेल तर संबंधित कारखान्यांनी तो जाहीर करून मगच हंगाम सुरू करण्याच्या सूचना साखर आयुक्तांच्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी पहिल्या उचलीची घोषणा केली आहे. हंगाम संपल्यानंतर शेवटी मिळणाऱ्या उताऱ्याच्या आधारावर उर्वरित रक्कम आदा करायची आहे.
................
२७ कारखान्यांना गाळप परवाना
यावर्षी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील मिळून २७ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यात कोल्हापुरातील सहकारी ११ व खासगी पाच तर सांगली जिल्‍ह्यातील सहकारी आठ व खासगी ४ अशा बारा कारखान्यांचा समावेश आहे. उर्वरित कारखान्यांचा परवाना साखर आयुक्त कार्यालयाच्या पातळीवर प्रलंबित आहे.