विमानतळ जागा न्यायालयात जाणार - सांगली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळ जागा न्यायालयात जाणार - सांगली
विमानतळ जागा न्यायालयात जाणार - सांगली

विमानतळ जागा न्यायालयात जाणार - सांगली

sakal_logo
By

विमानतळ जागेबाबत न्यायालयात जाणार

कवलापूर ग्रामपंचायतीचा निर्णय; सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. ३१ : कवलापूर विमानतळाची जागा एका खासगी कंपनीला विकली गेली आहे. ही जागा विमानतळासाठी दिली होती, मात्र शासनाने मूळ प्रकल्प न राबवता ही जागा एमआयडीसीला वर्ग करून जागेची विक्री केली आहे. या व्यवहाराविरोधात ग्रामपंचायतीतर्फे न्यायालयात दावा करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. या प्रकरणी विमानतळ जागा बचाव कृती समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे सरपंच सुषमा पाटील व ग्रामपंचायत सत्ताधारी गटनेते भानुदास पाटील सांगितले.
कवलापूर ग्रामपंचायतीची मासिक बैठक सरपंच सुषमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला ग्रामसेवक सचिन पाटील, उपसरपंच प्रमोद पाटील, सत्ताधारी पक्षाचे गटनेते, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य निवास पाटील, सौरभ पाटील, शरद पवळ, कुमार पाटील, सदस्या शुभांगी नलावडे, चंदाबाई ढवणे, उज्ज्वला गुंडे, वंदना मोहिते, विद्याताई माळी उपस्थित होते.
कवलापूर येथील विमानतळाची तब्बल १६० एकर जागा गुजरात येथील श्री श्रीष्टा या खासगी कंपनीला दिली गेली आहे. ही जागा ग्रामपंचायतीला मिळणे आवश्यक असल्याचा मुद्दा ग्रामपंचायत सदस्य शरद पवळ यांनी सभेत मांडला. यावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामपंचायत सत्ताधारी गटनेते भानुदास पाटील म्हणाले, ‘‘कवलापुरात विमानतळ व्हावे, म्हणून ही जागा देण्यात आली होती. शासनाने मूळ उद्देश बाजूला ठेवला. ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता ही जागा परस्पर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडे वर्ग केली. आता त्यांनी जागेचा व्यवहार केला आहे. भविष्यात ग्रामपंचायतीला प्रकल्प राबविण्यासाठी जागा नाही. त्यामुळे या जागेचा व्यवहार रद्द व्हावा व जागा ग्रामपंचायतीला मिळावी म्हणून न्यायालयीन लढा लढू.’’
उपसरपंच प्रमोद पाटील यांनी जागेसंदर्भात जागा बचाव कृती समितीची स्थापना करावी, अशी मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य निवास पाटील व माजी उपसरपंच सौरभ पाटील यांनी देखील जागेसंदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले. सरपंच सुषमा पाटील यांनी जागेच्या व्यवहाराविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात कवलापुरातील तज्ज्ञ व्यक्तींना घेऊन विमानतळ जागा बचाव कृती समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.