जेतेपदासाठी लढणार बंगळूर- मंगळूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेतेपदासाठी लढणार बंगळूर- मंगळूर
जेतेपदासाठी लढणार बंगळूर- मंगळूर

जेतेपदासाठी लढणार बंगळूर- मंगळूर

sakal_logo
By

59579
गडहिंग्लज : युनायटेड करंडक स्पर्धेत सोमवारी गडहिंग्लजच्या खेळाडूंनी मंगळूरच्या आघाडीपटूला असे घेरले होते. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

जेतेपदासाठी लढणार बंगळूर- मंगळूर
युनायटेड करंडक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा; गोवा, युनायटेडचे आव्हान संपुष्टात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : युनायटेड अखिल भारतीय करंडकासाठी बंगळूरचा किक स्टार्ट एफसी आणि मंगळूरच्या येनीपोया विद्यापीठात लढत रंगणार आहे. आज स्पर्धेच्या चौथ्या दिवशी झालेल्या चुरशीच्या उपांत्य फेरीत या दोन्ही संघांनी अनुक्रमे गोव्याचा साळगावकर आणि यजमान गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे आव्हान संपुष्टात आणले. युनायटेडचा टायब्रेकरमध्ये पराभव झाल्याने स्थानिक शौकिनांची निराशा झाली. येथील एमआर हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धा सुरू आहे. उद्या (ता. १) दुपारच्या सत्रात तिसऱ्या क्रमांकासाठी आणि त्यानंतर अंतिम सामना होणार आहे.
तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याने सामने पाहण्यासाठी दुपारीच एमआरचे मैदान हाउसफुल झाले होते. चारही संघांनी तोडीस तोड खेळ करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली. पहिल्या सामन्यात बंगळूर किक स्टार्ट एफसीने गोव्याच्या मातब्बर साळगावकरचा २-१ असा पराभव केला. तिसऱ्याच मिनिटाला बंगळूरच्या अभिषेक पोवारने सुरेख मैदानी गोल करून बचावफळी हादरवून सोडली. अनपेक्षित गोलने गोव्याची त्रेधातिरपीट उडाली. यानंतर गोव्याने स्वतःला सावरत चढायांचा धडाका लावला; पण, बंगळूरच्या मध्य आणि बचावफळीने चिवट खेळ करून त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केल्याने रंगत टिकून राहिली. सामन्याच्या ७१ व्या मिनिटाला बंगळूरच्या निखिल राजने तीन बचावपटूंना गुंगारा देऊन अफलातून गोल केला. सामना संपण्यास दोन मिनिटे कमी असताना साळगावकरच्या मार्क कारावालोने केलेला गोल संघाचा पराजय टाळू शकला नाही.
दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात मंगळूरने गडहिंग्लज युनायटेडला टायब्रेकरमध्ये ५-४ असे नमवून घोडदौड कायम राखली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या युनायटेडने पूवार्धात प्रभावी खेळ करीत यासीन नदाफच्या माध्यमातून पहिला गोल केला. सामना संपण्यास केवळ एक मिनिट असताना मंगळूरच्या बाऊ निशानने बरोबरीचा गोल करीत स्थानिकांची निराशा केली. टायब्रेकरमध्ये मंगळूरच्या एन. गौडा, एमडी हासील, हसन, श्रीनंनद, रियाज यांनी, तर गडहिंग्लजच्या महेश सुतार, यासीन नदाफ, सागर पोवार, सुल्तान शेख यांनी गोल केले. पेनल्टीचा फटका अडविणारा मंगळूरचा गोलरक्षक गौडा सामनावीर ठरला. गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, केएसएचे सहसचिव राजेंद्र दळवी, सतीश माळी, मुरारी चिकोडे, सतीश घाळी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण होणार असल्याचे अध्यक्ष मलिकार्जुन बेल्लद यांनी सांगितले.

आजचे सामने
तिसरा क्रमांक - साळगावकर गोवा वि. गडहिंग्लज युनायटेड दु. १.३० वा.
अंतिम सामना - बंगळूर वि. मंगळूर दु. ३.३० वा.

२. गडहिंग्लजकर चमकले..
आजच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बंगळूरकडून स्थानिक अभिषेक पोवारने गोल करून चमक दाखवली. तर गोव्याकडून सौरभ पाटीलने संघाचे नेतृत्व करीत बचावफळीत चांगला खेळ करून कौशल्य दाखविले.
-----------------------
दीपक कुपन्नावर, गडहिंग्लज