शिवाजी पेठेतील दहा वर्षीय मुलाचा डेंगीमुळे मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी पेठेतील 
दहा वर्षीय मुलाचा
डेंगीमुळे मृत्यू
शिवाजी पेठेतील दहा वर्षीय मुलाचा डेंगीमुळे मृत्यू

शिवाजी पेठेतील दहा वर्षीय मुलाचा डेंगीमुळे मृत्यू

sakal_logo
By

L59596
शिवाजी पेठेतील
दहा वर्षीय मुलाचा
डेंगीमुळे मृत्यू
कोल्हापूर, ता. ३१ ः शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर माळी गल्लीतील ओंकार विनय लाड (वय १०) याचा आज डेंगीने मृत्यू झाला. आनंदात दिवाळी साजरी केलेल्या, मित्र-भावासोबत खेळणाऱ्या ओंकारचा असा अचानक मृत्यू झाल्याने आई-वडिलांसह लाड कुटुंबीय सैरभैर झाले आहे. त्याच्यावर शुक्रवारपासून उपचार सुरू होते. त्याच्या पाच वर्षीय लहान भावालाही डेंगीची लागण झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. यामुळे शिवाजी पेठ परिसरात पुन्हा डेंगीने हातपाय पसरायला सुरुवात केल्याची भीती आहे.
माळी गल्लीत राहणाऱ्या ओंकारला शुक्रवारी ताप आला. त्यावेळी स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले. ताप कमी न आल्यास डेंगीची तपासणी करू, असे सांगितले होते. त्यामुळे तो फुलेवाडी येथे मामाच्या घरी रहायला गेला होता. दोन दिवस गोळ्या खाऊनही ताप कमी न आल्याने रविवारी सकाळी फुलेवाडी येथील डॉक्टरांकडे जाऊन डेंगीची तपासणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्या डॉक्टरनी दिवसभर औषधोपचार करून सायंकाळी घरी जाऊ दिले होते. मध्यरात्री मात्र तो अचानक अत्यवस्थ झाला. त्याच्या शारीरिक हालचाली पाहून कुटुंबीयांनी तातडीने महापालिकेजवळील एका मुलांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी संबंधित डॉक्टरनी इतर अवयव व्यवस्थित कार्यरत असले तरी मेंदूत ताप गेल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यावर सोमवारी दुपारपर्यंत उपचाराची शर्थ केली; पण यश आले नाही व त्याचा मृत्यू झाला. त्याच्या लहान भावालाही ताप आल्याने डेंगीची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. ओंकार याच्या मागे आई-वडील, लहान भाऊ, काका, काकी, आजी असे एकत्र कुटुंब आहे. शिवाजी पेठेतील काही भागात यापूर्वीही डेंगीचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे महापालिकेने मोहीम राबवली होती. आता ओंकारचा मृत्यू झाल्यानंतर डेंगी पुन्हा पसरत असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे.