अपघातात सात ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात सात ठार
अपघातात सात ठार

अपघातात सात ठार

sakal_logo
By

34569
जुनोनी (ता. सांगोला) ः येथे सोमवारी सायंकाळी दिंडीत घुसलेली भरधाव मोटार.

भरधाव मोटार दिंडीत घुसली; मृतात पाच महिलांसह मायलेकराचा समावेश

कोल्हापूरचे सात वारकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ३१ : जठारवाडी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत मागून मोटार घुसल्याने दिंडीतील सात वारकरी ठार झाले. हा अपघात आज सायंकाळी सातच्या सुमारास जुनोनी (ता. सांगोला) येथे घडला. मृतांमध्ये जठारवाडी आणि वळिवडेतील पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पैकी वळिवडेतील मायलेक आहेत. कार्तिकी वारी काही दिवसांवर आलेली असताना सात वारकऱ्यांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जठारवाडी येथून माऊली भजनी मंडळाचे ३६ भाविक कार्तिकी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने चालत निघाले होते. ही दिंडी सोमवारी सांगोला तालुक्यात दाखल झाली. जुनोनी (ता. सांगोला) येथे दिंडी जेवणासाठी थोडे अंतरावर थांबणार होती. मात्र, त्या अगोदरच सायंकाळी सातच्या सुमारास सांगलीहून सांगोल्याच्या दिशेने येत असणारी मोटार (एमएच १३/डीई ७९३८) पाठीमागून दिंडीत घुसली. दिंडीतील रंजना बळवंत जाधव (वय ५५), सर्जेराव श्रीपती जाधव (४५), शारदा आनंदा घोडके (४०), सुनीता सुभाष काटे (५०), शांताबाई जयसिंग जाधव (५०, सर्वजण जठारवाडी, ता. करवीर) तर सुशिला पवार (३५) व गौरव पवार (१४) ही माय-लेकरे (रा. वळिवडे, ता. करवीर) जागीच ठार झाले. जखमी झालेल्या शांताबाई सुभाष जाधव (७०) यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या भीषण अपघातात अनिता गोपीनाथ जगदाळे (६०), अनिता सरदार जाधव (५५), सरिता अरुण शियेकर (४५), सुभाष केशव काटे (६७), शाणूताई विलास शियेकर (३५) जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते; परंतु, यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

जखमी भाविकांसोबत आरोग्यमंत्र्यांचा संवाद
दिंडीतील जखमी भाविक सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे जिल्हा उपप्रमुख दत्तात्रय सावंत यांच्या दूरध्वनीवरून संपर्क साधला व जखमींना धीर दिला. सर्व भाविकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

पोलिसांची तत्परता
अपघाताची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ व सांगोल्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी व त्यांच्या पथकाने जुनोनी येथे धाव घेऊन जखमींना दवाखान्यात हलविले. त्याचवेळी अन्य भाविकांना धीर दिला. पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनीही सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये थांबून जखमींना पुढील उपचारासाठी हालविणे व इतर मदतीसाठी प्रयत्न केले.


घटनास्थळी हृदयद्रावक चित्र
दिंडीतील भाविक थोड्याच अंतरावर जेवणासाठी थांबणार होते. त्यामुळे ते मागेपुढे करीत रस्त्यावरून जेवणस्थळाकडे निघाले असतानाच मोटार दिंडीमध्ये घुसली आणि भाविक चिरडत घेऊन गेली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला दिसला. वारकऱ्यांचे सारे साहित्य विखरून पडले होते. घटनास्थळाचे चित्र मन हेलावून टाकणारे होते.

अधीक्षक व पदाधिकाऱ्यांत वाद
अपघात घडल्यानंतर जखमींना तत्काळ सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम फुले तब्बल एका तासानंतर दवाखान्यात आले. त्यातून सांगोला येथील राजकीय पक्षाचे पदाधिकारी व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यात वादावादी झाली. तुम्ही फक्त आलेले रुग्ण पुढे पाठवण्यासाठी सरकारचा पगार घेता का..? असा संतप्त सवाल राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने धडक दिली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकरी बांधवांच्या नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून जखमी वारकरी बांधवांना तातडीने योग्य ते उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे