पॅचवर्क फोलपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॅचवर्क फोलपणा
पॅचवर्क फोलपणा

पॅचवर्क फोलपणा

sakal_logo
By

59724, L59815, L59805

नुसतं पॅचवर्क...

खडी पसरून होणारी फसवणूक केली उघड
कोल्हापूर, ता. १ ः शहरवासीयांकडून रस्त्यांच्या अवस्थेबाबत संताप व्यक्त केला जाऊ लागल्यानंतर महापालिकेने पॅचवर्कच्या कामांना वेग दिला आहे. काही ठिकाणी ठेकेदारांकडून, तर काही ठिकाणी महापालिकेकडून काम केले जात आहे; पण पॅचवर्क कामे इंडियन रोड काँग्रेसच्या नियमांप्रमाणे होत नसल्याचे दिसत आहे. सरधोपटपणे खड्डे बुजवले जात असून, काही ठिकाणी डांबरच नसल्याचे आज सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केले.
शहरातील अनेक रस्ते वॉरंटी कालावधीत असल्याने त्यांची दुरुस्ती, पॅचवर्क संबंधित ठेकेदारांकडून करून घेतले जात आहे. अनेक ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी खड्ड्यांचे पॅचवर्क करत आहेत. त्यासाठी खड्ड्यात डांबरावर मोठी खडी टाकून त्यावर डांबर टाकून रोलर फिरवून बारीक खडी टाकली जात आहे; पण हे इंडियन रोड काँग्रेसच्या नियमांना धरून नाही, असे अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. यापेक्षाही आज डांबर न टाकता केवळ बारीक खडी पसरून पॅचवर्कचा सोपस्कार केला गेल्याची बाब कॉमन मॅन संघटनेचे ॲड. बाबा इंदूलकर यांनी एका व्हिडिओद्वारे उघड केली.
बोंद्रेनगरच्या चौकात एक दिवसापूर्वी केलेल्या पॅचवर्कचा कारभार त्यात दाखवला आहे. ॲड. इंदूलकर यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकला आहे. त्यामध्ये त्यांनी एक दिवसापूर्वी महापालिकेने बोंद्रेनगर चौकात पॅचवर्क केल्याचे सांगितले. पण, त्या पॅचवर्कसाठी केवळ बारीक खडीच पसरलेली आहे, असे दाखवले. इंदूलकर यांनी ती खडी दोन्ही हातांनी एकत्रित केली असून, त्यात डांबर दिसत नाही. अशाप्रकारच्या खडी पसरण्याने दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. चौकात अशाप्रकारची खडी पसरलेली आहे. रात्री त्या खडीचा अंदाज दुचाकीस्वारांना येत नाही. त्यातून वाहने घसरण्याची शक्यता आहे.

कोट
करायचेच नव्हते तर केल्याचा दिखावा करणे चुकीचे आहे. आता निधीअभावी डांबर नाही म्हणून पॅचवर्क करू शकत नाही, असे स्पष्ट सांगितले असते तर जनतेने ते मान्य केले असते; पण खोटे दावे व फसवणूक जनता सहन करणार नाही. जिथे पाहणी केली तेथील रस्त्यावर खडीत डांबर नव्हते.
-ॲड. बाबा इंदूलकर.
---
कोट
डांबराने खड्डे व्यवस्थित भरले होते. त्यावर पसरलेली खडी वाहतुकीने बाजूला सरकली होती. त्याठिकाणी डांबर नव्हते, पण ज्या ठिकाणी खड्डे भरले होते तिथे बाब इंदूलकर यांनी पाहणी केलेली नाही. भरलेल्या खड्ड्यातील खडी उखडलेली नाही, याची मी खात्री केली आहे.
-बाबूराव दबडे, उपशहर अभियंता.
.............................
ही आहे आदर्श पॅचवर्कची पद्धत
-प्रथम खड्डे चौकोनी किंवा षटकोनी आकारात कट करून घेणे
-त्यानंतर खड्डे तसेच परिसरातील धूळ काढणे
-स्वच्छ खड्ड्यात ४० एमएमची डांबरयुक्त खडी भरणे
-त्यावरून रोलर फिरवून ती पक्की करणे
-त्यावर २० एमएम डांबरयुक्त खडी टाकणे
-शेवटी बारीक खडीचा सील कोट अंथरुण रोलरने फिरवणे
-या साहित्याची उंची शेजारील रस्त्यापेक्षा अर्धा इंचापेक्षा जास्त नसावी.

-सुशील हंजे, अभियंता
...................
सध्या असे होते पॅचवर्क
-खड्ड्यात डांबर टाकून मोठी कोरडी खडी टाकली जाते
-नंतर रोलर फिरवला जातो
-त्यावर बारीक खडी टाकून पुन्हा रोलर फिरवला जातो.