मेन राजारामच्या स्‍थलांतराचा ''घाट'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजारामच्या स्‍थलांतराचा ''घाट''
मेन राजारामच्या स्‍थलांतराचा ''घाट''

मेन राजारामच्या स्‍थलांतराचा ''घाट''

sakal_logo
By

59774
कोल्हापूर - मेन राजाराम हायस्कूलची सुंदर इमारत
...........


मेन राजाराम हायस्कूलच्या स्‍थलांतराचा ‘घाट’

केवळ तोंडी आदेश : ७७२ मुलांवर संकट; पर्यायी व्यवस्‍थेसाठी चाचपणी; शिक्षण विभागाची पळापळ

सदानंद पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १ : शहराच्या मध्यवस्‍तीत असलेले व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या जिल्‍हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्‍कूलच्या स्‍थलांतराचा ‘घाट’ घातला जात आहे. कायदेशीर पत्रव्यवहार न करता सध्या तोंडी आदेशावरच विविध प्रकारची माहिती घेतली जात आहे. सध्या या शाळेत ७७२ मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना कसबा बावडा येथे स्‍थलांतरीत करण्यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. २०२१ पासून ही शाळा हळूहळू बंद पाडण्याची एक नियोजनबद्ध व्यवस्थाच सुरू असल्याचे दिसत आहे. विद्यार्थी संख्या कमी करत आणत हा ‘डाव’ साधण्यात येत आहे.
मेन राजाराम हायस्‍कूलची स्‍थापना १८५१ मध्ये झाली. छत्रपती राजाराम महाराज यांनी १५ फेब्रुवारी १८७० मध्ये या शाळेची इमारतीची पायाभरणी केली. तेव्‍हापासून आजअखेर या शाळेतून ज्ञानदानाचे काम सुरू आहे. अलीकडे १५ वर्षांत हायस्‍कूलची दुरवस्‍था झाली आहे. खासगी शाळांकडील वाढलेला कल की जिल्‍हा परिषदेने या शाळेकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुरवस्था झाली, हा संशोधनाचा विषय आहे. या शाळेतून गोपाळ कृष्‍ण गोखले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सर एस. व्‍ही. सबनीस दिवाण, कोल्‍हापूर संस्‍थांनचे दिवाणबहाद्दूर अण्‍णासाहेब लठ्ठे यांच्यासह रँग्‍लर, बॅरिस्‍टर, न्यायमूर्तींसह अनेक मंत्री, साहित्यिक, आमदार, खासदारांनी शिक्षण घेतले आहे.
कोल्‍हापूरचा नावलौकिक वाढविणाऱ्या या शाळेकडे जिल्‍हा परिषदेने अक्षम्य दुर्लक्ष्य करण्याचे कारण काय, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. त्यातूनच ही शाळा व शाळेचे मैदान लाटण्याचा प्रकार यापूर्वी अनेकवेळा झाला आहे. कोणाला हेरिटेज हॉटेल काढायचे आहे, तर कोणाला यात्री निवास तर कोणाला फाईव्‍ह स्‍टार मॉल काढायचे स्‍वप्‍न पडत असते. यावेळीही असाच प्रकार सुरू आहे. कागलकर हाऊसनंतर आता मेन राजाराम हायस्‍कूलला लक्ष्य करण्यात आले आहे.
.....

प्रशासनाचे तोंडावर बोट
गेल्या दोन महिन्यांपासून ‘मेन राजाराम’चे स्‍थलांतर करण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत जिल्‍हा परिषद प्रशासनाला तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. कसबा बावडा येथे मेन राजारामच्या ७७२ मुलांचे स्‍थलांतर करणे, त्यासाठी आवश्यक इमारत व सोयीसुविधांची माहिती घेतली जात आहे; मात्र कागदोपत्री कोणतेही आदेश देण्यात आलेले नसल्याने प्रशासनाने तोंडावर बोट ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
...
कृती समिती काय करणार?
शहराच्या प्रत्येक प्रश्‍‍नात कृती समिती आपली भूमिका जाहीर करत असते. मेन राजारामच्या स्‍थलांतराचा प्रश्‍‍नही कोल्‍हापूरकरांच्या अस्‍मितेचा व जिव्‍हाळ्याचा आहे. त्यामुळे अधूनमधून मेन राजारामबाबत होणाऱ्‍या चर्चेबाबत कृती समितींनीही आता भूमिका स्‍पष्‍ट करणे आवश्यक आहे.
.....

‘सकाळ’ची भूमिका
शिक्षणाचा बाजार झाला असताना सरकारी शाळा टिकणे आवश्यक आहे. मेन राजाराम हायस्‍कूल तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. शहरातून मुलं चालत व सायकलवरून या शाळेला येतात. एकेकाळी या शाळेत प्रवेशासाठी आमदार, खासदार, महापौर व मंत्र्यांकडूनही शिफारसपत्रे दिली जात असत. अलीकडे मात्र ठरवून ही शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे. ही शाळा बंद किंवा स्‍थलांतर करून हजारो गोरगरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचाच हा प्रकार आहे. ही शाळा आहे त्या ठिकाणीच सुरू राहणे आवश्यक आहे.