पर्यटन मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन मालिका
पर्यटन मालिका

पर्यटन मालिका

sakal_logo
By

60003
लोगो
पर्यटनाचा
खेळखंडोबा
भाग १

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्यात जवळपास ३३ हून अधिक प्रेक्षणीयस्थळे आहेत. तेथे दिवसाकाठी एक ते दीड लाख पर्यटक भेट देतात. ६५ ते ७० टक्के पर्यटक एक दोन दिवसांचा मुक्काम करतात. दिवसाकाठी कोट्यवधीची उलाढाल होते. या उलट कोल्हापुरात सात तालुके जंगली, डोंगरी आहेत. तेरा एतिहासिक किल्ले, साडेतीन शक्तिपीठापैकी एक अंबाबाई मंदिर आहे. यांसह शहरात जवळपास २६ प्रेक्षणीयस्थळे आहेत. अशी भरगच्च पर्यटन मेजवाणी असूनही केवळ पर्यटन विकास आरखड्यावर केवळ चर्चा झडल्या. प्रत्यक्ष सुविधा देण्यात सर्वच पातळ्यांवर अक्षम्य दुर्लक्ष केले. आणि संधी असूनही पर्यटनांचा बट्ट्याबोळ होतोय. त्यामुळे पर्यटन अर्थकारणाला खीळ बसली. हे चित्र बदलण्यासाठी जनरेटाच उभाकरून लोकप्रतिनिधी व सनदी अधिकाऱ्यांना जागे करण्याची गरज आहे. याचा वेध घेणारी मालिका आजपासून...

माहितीअभावी कोल्हापुरी पर्यटन नजरेआड
माहिती केंद्र लंगडेच; मोजकी ठिकाणे पाहूनच पर्यटक माघारी, विकास भाषणापुरताच
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. २ : जिल्ह्यात प्राचीन मंदिरे, गडकोट किल्ले, घनदाट जंगल, सात घाट माथे, थंड हवेची ठिकाणे असे विलोभनीय तितकेच नयनमनोहरी सौंदर्य लाभलेले आठ तालुके आहेत. येथे पर्यटनाला मोठी संधी आहे. त्यासाठी पाच वर्षांपूर्वी ‘आडवाटेचे कोल्हापूर’ ही संकल्पना राबवली त्यातून लौकिकच्या आड लपलेली नवी ठिकाणे, राज्यभरातील पर्यटकांच्या पसंतीस उतरली. मात्र सरकार बदलेले, अधिकारी बदलेले आणि चांगला उपक्रम गुंडाळला. पर्यटन पूरक साध्या सुविधा देण्यात प्रशासनाने कंजुशी दाखवली. तर लोकप्रतिनिधींच्या लेखी जिल्‍हा पर्यटन विकास केवळ भाषणात सांगण्याचा मुद्दा उरला, परिणामी कोल्हापुरात पर्यटक येतात, निघून जातात. असा वर्षानुवर्षाचा कित्ता कायम आहे.
देशभरातील बहुतांशी पर्यटकांचा ओघ गोवा तसेच कोकण समुद्र किनारपट्टीकडे आहे. बहुतांश पर्यटक कोल्हापूरमार्गे तिकडे पर्यटनाला जाताना कोल्हापुरात एक रात्र मुक्काम करतात किंवा कोल्हापुराला धावती भेट देत पुढे जातात. हाच पर्यटक कोल्हापूर जिल्ह्यात दोन-तीन दिवस राहून भरगच्च पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो. तशी पूरक स्थिती कोल्हापुरात असूनही कोणत्याही ठिकाणांचे मार्केटिंग नाही. महामार्ग अथवा राज्यमार्ग गावांच्या नावापलीकडे फलक नाहीत. त्यामुळे बहुतांशी पर्यटक ठरलेली ठिकाणे, अंबाबाई देवी दर्शन, रंकाळा, न्यू पॅलेस, पन्हाळा, जोतिबा पाहून पुढे जातात.
वास्तविक जिल्ह्यातील विलोभणीय ठिकाणे, धार्मिक मंदिरे, गडकोट किल्ले, लोक, खाद्य संस्कृती, कृषी पर्यटन, जंगल, वन्यजीव यांसह कोल्हापूर शहरापासून किती किमी अंतर आहे, अशी माहिती देणारी सुविधा येथे आवश्यक आहे.
कोल्हापूरचे पर्यटन म्हटले की, महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळ बघेल अशा भूमिकेत बहुतेक अधिकारी राहिले. महामंडळाचे विभागीय कार्यालय कोल्हापूरवरून पुण्याला हलविले. त्याला दहा वर्षे झाली. अंबाबाई मंदिराजवळ महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोल्हापूर पर्यटनाची माहिती देणारे केंद्र स्थापन केले. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. झोकात उद्‍घाटन झाले. काही महिने केंद्राला प्रतिसाद होता. पुढे केंद्राचा व पर्यटकांचा उत्साह मावळला. केवळ माहिती मिळते एवढे नावापुरते केंद्राचे अस्तित्व आहे. येथे एक-दोन प्रतिनिधी माहिती देण्यासाठी असतात. ही एकमेव लंगडी सुविधा वगळता कोल्हापूर पर्यटनाची अधिकृत माहिती देण्यासाठी अन्य पर्यायी व्यवस्था नाही. परिणामी आडवाटेचे कोल्हापूर पर्यटनाची माहिती फारशी कुठे मिळत नाही. समाज माध्यमावरील व्हिडिओ बघून काहीजन पर्यटनाला येतात. मात्र स्थानिक पातळीवर काय बघावे, किती अंतर, कोठे जावे, निवासाची सुविधा काय, हेच माहीत नसल्याने बहुतेकजन वरवरचे कोल्हापूर दर्शन करून निघून जातात. असा निघून जाणारा पर्यटक वर्ग कोल्हापूरच्या पर्यटन विकासाचे अपयश दर्शवतो आहे. वर्षानुवर्षाचे असे चित्र असूनही सर्व पातळ्यांवर असलेली उदासीनता झटकण्यासाठी जनरेट्याची गरज आहे.
---------------
दृष्‍टिक्षेपात जिल्‍ह्यातील पर्यटन व्यवस्था
- रोजची पर्यटक संख्या ५० हजार ते दीड लाख
- हॉटेल, यात्री निवासांची क्षमता १५ हजार खोल्या
- हॉटेल जेवण नाष्टा सुविधा २५००
- पर्यटन प्रवासी सुविधा गाड्या २०००
- सार्वजनिक प्रवासी बसगाड्या ५००
- खासगी बसगाड्या ३५०