आजरा ः सुगीचा हंगाम लांबला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः सुगीचा हंगाम लांबला
आजरा ः सुगीचा हंगाम लांबला

आजरा ः सुगीचा हंगाम लांबला

sakal_logo
By

आजऱ्यात सुगीचा हंगाम लांबला
भात, भुईमूग काढणी कुर्मगतीने ; परतीच्या पावसाचा फटका

आजरा, ता. १ ः आजरा तालुक्यात यंदा सुगीचा हंगाम लांबला आहे. परतीच्या पावसाचा फटका हंगामाला बसला आहे. शिवारात पाणी व दलदल कमी न झाल्याने भात कापणी व अन्य कामे करण्यास अडचणी आल्या आहेत. त्यामुळे सुगीचे काम कूर्मगतीने सुरु आहे. यंदा डिसेंबरपर्यंत सुगीची कामे चालणार असल्याचे सांगण्यात येते. तालुक्यात उत्तर भाग व पूर्व भागातील सुगीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पश्चिम भागात सुगीच्या कामाला म्हणावा तसा जोर नाही.
आजरा तालुक्यात भात, नागलीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. तालुक्यात खरिपाचे क्षेत्र २२ हजार हेक्टर आहे. यापैकी ९ हजार ८०० हेक्टरवर भात व ४ हजार हेक्टरवर नागलीची लागवड होते. त्यामुळे ही तालुक्यातील मुख्य पिके आहेत. पूर्व व उत्तर परिसरात भात कापणी व मळणी कामे सुरु आहेत. ही कामे अतिम टप्प्यात आहेत. सोयाबीन काढणीचे काम शंभर टक्के झाले आहे. भुईमूग काढणीचे काम सुरु आहे. आजरा व गवसे पश्चिम भागात सुगीचा जोर म्हणावा तसा नाही. परतीच्या पावसाचा फटका सुगीवर झाला आहे. गत आॅक्टोबरमध्ये मुसळधार व ढगफुटीसदृश पाऊस ठिकठिकाणी झाल्याने जमिनीतील आेलावा कमी झालेला नाही. शिवारात पाणी व दलदल आहे. त्यामुळे सुगीच्या कामांना वेग नाही. सध्या तालुक्यात ३० टक्के भाताची सुगी व २५ टक्के भुईमूग काढणीचे काम झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. नागली पीक परिपक्व झालेले नाही. त्यामुळे नागली शेंडलणीचे काम आठवडाभरात सुरु होईल. यंदा तालुक्यात सुगीला दहा ते पंधरा दिवस उशीर झाल्याने हंगाम लांबणार आहे.

चाैकट
ऊस गळीतावर परिणाम
शिवारात पाणी व दलदल असल्याने ऊस गळीत हंगामावर याचा परिणाम झाला आहे. शिवारातील ऊसतोडणी ठप्प आहे. रस्त्याकडील ऊस तोडणी सुरु आहे. त्यामुळे आजऱ्यासह या परिसरातील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही.