मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम

sakal_logo
By

युवा मतदारांनी नोंदणी करावी ः जिल्हाधिकारी

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर ते ५ जानेवारीदरम्यान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर ते ५ जानेवारीदरम्यान होत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या १ जानेवारी २०२३ अर्हता दिनांकावर तो आधारित आहे. त्यासाठी अधिकाधिक युवक-युवतींनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.
रेखावार म्हणाले, ‘आयोगाने २५ जुलै २०२२ च्या पत्रान्वये कार्यक्रम जाहीर केला आहे. पूर्व-पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ४ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर दरम्यान मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी आणि एकत्रितकृत व प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयावर त्याची जबाबदारी निश्‍चित केली आहे. या दरम्यान मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निश्‍चित केलेले दोन शनिवार व रविवारी विशेष मोहीम असणार आहे.’
ते म्हणाले, ‘‘दावे व हरकती २६ डिसेंबरला निकालात काढल्यानंतर ३ जानेवारीला यादीच्या अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागितली जाणार आहे. तसेच डाटाबेस अद्ययावत करून पुरवणी याद्यांची छपाई केली जाईल. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारीला केली जाणार आहे.’’ पत्रकार परिषदेस जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते.