ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांचा ठेंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांचा ठेंगा
ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांचा ठेंगा

ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांचा ठेंगा

sakal_logo
By

ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांचा ठेंगा
गडहिंग्लज तालुका; महसूल विभागाने मोहिम राबवूनही फिरविली पाठ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : सातबारा पत्रकी पीक पाणी नोंदणी आता महसूल विभागाने ऑनलाईन पद्धतीने केली आहे. परंतु ऑनलाईन पद्धतीचा हा उतारा शेतकर्‍यांवर परिणामकारक न ठरल्याने ई-पीक पाहणीला त्यांनी ठेंगा दाखवला आहे. महसूल विभागाने गावागावात शेतकर्‍यांच्या मदतीला टेक्नोसेव्ही तरुणाई सज्ज ठेवूनही या मोहिमेकडे पाठ फिरविली आहे. मात्र भविष्यात कोणत्याही भरपाईसाठी ऑनलाईन नोंदणीच ग्राह्य मानण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांचेच यात नुकसान असल्याचे सांगण्यात येते.
पूर्वी सातबारा पत्रकी पीक पाणी नोंदीची कार्यवाही ऑफलाईन पद्धतीने होत असे. चावडीत जायचे आणि तलाठ्याकडे शेतात पीक कोणते आहे याची माहिती देवून शेतकरी पीकपाणी नोंद करायचे. या प्रक्रियेत पारदर्शकपणा आणण्यासाठी शासनाने दोन वर्षापासून पिक पाणी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने केली आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅपही काढले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वत:च्या शिवारात जावून संपूर्ण माहितीसह पिकाचा व आपला फोटो अपलोड केल्यानंतर ही नोंदणी पूर्ण होते.
दरम्यान, यावर्षीची पिक पाणी नोंदणीची कार्यवाही सुरु झाल्यानंतर महसूल विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले. परंतु यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या. मुळात शेतवडीत मोबाईल रेंज रामभरोसेच असते. त्यात ऑनलाईन प्रक्रियेपासून शेतकरी अनभिज्ञ आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी महसूल विभागाने गावागावातील टेक्नोसेव्ही तरुणाईला ई-पीक पाहणीसाठी आवाहन केले. ही प्रक्रिया गतीमान होण्यासाठी ७४१ भौगोलिक गटही तयार केले. टेक्नोसेव्ही तरुणांकडून शेतकर्‍यांना सोबत घेत प्रत्यक्ष शिवारात जावून ई-पीक पाहणी सुरु झाली. काही शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसादही दिला. परंतु, वारंवार आवाहन करुनही शिवारात येण्यास बहुतांशी शेतकर्‍यांनी पाठही फिरविली. तरीसुद्धा गडहिंग्लज, आजरा व चंदगड विभागात गडहिंग्लज तालुका ऑनलाईन पिकपाणी नोंदवण्यात अग्रेसर राहिल्याचे सांगण्यात येते.
---------------
चौकट...
११ हजार ५४९ खातेदारांची नोंदणी
गडहिंग्लज तालुक्यात ८० हजार ३५० एकूण खातेदारांची संख्या आहे. दोन महिन्यात यातील ११ हजार ५४९ खातेदारांनी ऑनलाईन ई पिक पाहणीची नोंद केली आहे. यासाठी गावागावातील टेक्नोसेव्ही तरुणांचा मोठा हातभार राहिला आहे.
--------------
कोट...
पिक पाहणीच्या नोंदी पीक कर्ज वाटपासह नैसर्गिक आपत्तीमध्ये होणार्‍या पीक नुकसानीच्या व पीक विम्याच्या अचूक भरपाईसाठी उपयुक्त ठरते. यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन पिकपाणी नोंद मोहिम गांभीर्याने घ्यावी.
- दिनेश पारगे, तहसीलदार