जूना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जूना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन
जूना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

जूना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

sakal_logo
By

हिंदू म्हणून एक होण्याची गरज
नीतेश राणे ः जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर आंदोलनात आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः प्रत्येकवेळी कोणी तरी येतो आणि आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहतो. कारण आपण एक नाही. त्यामुळे आता आपण हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे. राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार आहे. हिंदुत्‍ववादी विचारांचे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. जे चुकीचे काम करतील त्यांचे ‘करेक्ट कार्यक्रम’ केले जातील, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर झालेल्या आंदोलनात ते बोलत होते.
शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून, १५ दिवस झाले तरी अद्याप पोलिस तिला शोधू शकलेले नाहीत. त्यामुळे जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी ठिय्या आंदोलन केले.
आमदार राणे म्हणाले, ‘‘आपल्याला हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे. आपली एकजूट नसल्याने सातत्याने आपल्यावर अन्याय होतो. पोलिस आपली दखल घेत नाहीत. आत्ताही पोलिसांना एका मुलीला शोधता येत नाही. त्यांच्याकडे सगळी माहिती आहे. पण, त्यांना मुलगी सापडत नाही. कारण त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही. उल्हानसनगर येथेही अशीच घटना घडली. त्या पोलिस ठाण्यात जाऊन बसलो आणि दोन तासात मुली घरी परतल्या. पोलिसांनी लक्षात घ्यावे आता राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. जो कर्तव्यात कसूर करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. आता दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी कोणी मंत्री येणार नाही. राज्यात अशा प्रकारे मुलींचे अपहरण होण्याच्या घटना वाढल्या आहेत. जोपर्यंत हिंदू म्हणून आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत.’’
महेश जाधव, महेश उरसाल, संभाजी साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिक्‍कोडे, पृथ्वीराज महाडिक, हेमंत अराध्ये, अनिरुद्ध कोल्हापुरे, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, अमित कांबळे, उदय भोसले, अमोल पालोजी, डॉ. सदानंद राजवर्धन, हर्षद कुंभोजकर, विजय अग्रवाल, विवेक कुलकर्णी, अतुल जाधव, ॲड. केदार मुनिश्वर, सुनील पाटील, चंद्रकांत बराले, धनश्री तोडकर, ॲड. मानसी जोशी, सुजाता पाटील यांच्यासह हिंदुत्‍ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
चौकट
आमची मुलगी परत आणा
यावेळी अपहरण झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. १५ दिवस झाले तरी आमची मुलगी परत आलेली नाही. पोलिस उडवाउडवीची उत्तरे देतात. आमची मुलगी आम्हाला परत आणून द्या, अशी कळकळीची विनंती आई, वडिलांनी केली.
.....
चौकट
पोलिस तपासावर आक्षेप
नीतेश राणे यांनी पोलिस ठाण्यात जावून अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांची भेट घेतली. त्यांच्यातकडून तपासाची माहिती घेतली. या वेळी राणे यांनी पोलिस तपास नीट होत नाही अशी खंत व्यक्त केली. २२ वर्षांचा मुलगा १५ दिवस झाले तरी सापडत नाही. मुलीच्या पालकांना पोलिस ठाण्यात उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. साधे सीडीआर तुम्हाला सापडत नाहीत, असा आक्षेप राणे यांनी नोंदवला.