हिवाळ्यात गरोदर मातांनी घ्यायची काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळ्यात गरोदर मातांनी घ्यायची काळजी
हिवाळ्यात गरोदर मातांनी घ्यायची काळजी

हिवाळ्यात गरोदर मातांनी घ्यायची काळजी

sakal_logo
By

चौरस आहारासह भरपूर प्या पाणी...
गर्भवतींनी हिवाळ्यात अशी घ्यावी काळजी; अभ्यंगस्नानमुळे लाभ, प्रकृती स्थिर ठेवण्यावर हवा भर
नंदिनी नरेवाडी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : गरोदरपणाचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्‍वाचा काळ असतो. प्रसूतीसाठीही हिवाळा हा ऋतू अनुकूल समजला जातो. मात्र हिवाळ्यात चौरस आहारासोबत काळजी घेतल्यास गर्भारपण सोपे होते आणि प्रसूतीही सुरक्षित होण्यास मदत होते. हिवाळ्यात गर्भवती महिलांनी तेलाने अभ्यंगस्नान, फळ, भाज्या व सुकामेवा अशा चौरस आहारासोबत प्रकृती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्याची गरज असते. थंड आणि कोरडी हवा यामुळे त्वचा नैसर्गिक आर्द्रता आणि त्यातील तेल हरवते. पोट वाढल्यावरसुद्धा त्वचेला तडे पडतात. यामुळे अनेक स्त्रियांना वेदना देखील होतात. याच कारणामुळे गरोदर स्त्रियांच्या पोटावर जास्त स्ट्रेच मार्क्‍स येतात. यापासून त्वचेचा बचाव करायचा असेल, तर गरोदर महिलांनी त्वचेवर तिळ तेलाचे अभ्यंग वेळोवेळी करावे. यामुळे स्कीन हायड्रेट राहते.
जास्त पाणी प्यायल्याने वारंवार झोपमोड करून लघवीला जावे लागते, गरोदर स्त्रियांसाठी हे त्रासदायक असल्याने त्या कमी पाणी पितात. मात्र, ही एक मोठी चूक ठरू शकते. गरोदरपणात शरीराला जास्त पाणी लागते. जर गरोदरपणात डिहायड्रेशन झाले, तर बाळासाठी आवश्‍यक असणारे गर्भजल कमी होऊ शकते. यामुळे मुदतपूर्व प्रसूतीचा धोका उद्‌भवतो. तसेच प्रसूतीनंतर अंगावरचे दूधसुद्धा कमी होऊ शकते. म्हणून गरोदर स्त्रियांनी हिवाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाण्यासोबतच फळ आणि भाज्यांचा ज्यूससुद्धा प्यावा. कोमट पाण्यात पाय ठेवावेत. गरोदरपणात संतुलित आहारात फळांचा समावेश हवा. फळे आपल्या रोगप्रतिकार शक्तीला मजबूत ठेवण्याचे काम करतात. आवळ्याचा ज्यूस हा मॉर्निंग सिकनेस, मळमळ, अपचन आणि गरोदरपणातील अन्य त्रासदायक समस्यांना कमी करण्यात मदत करू शकतो. पेरू आणि संत्री यासारखी पाणीदार फळे व काळे मनुके खावेत. जेणेकरून मलारोधचा त्रास होणार नाही. पालक, मेथी आणि कांद्याच्या पातीसारख्या भाज्यांचा समावेश असावा. सुका मेवा, खारीक, खोबरे, तूप घालून लाडू करून खावे.
-----------------
हे करा
- जेवणानंतर शतपावली
- अंगाला तेल व उटणे लावून गरम पाण्याने स्नान
- आहारात दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ वापर करावा
- उपवास करणे टाळा, रोज ताजे आणि सात्विक अन्नाचे सेवन करा
- रोज वापरायचे कपडे स्वच्छ धुवून आणि सूर्यप्रकाशात कोरडे करूनच वापरावेत
- रोज सकाळच्या कोवळ्या उन्हात थांबावे
------------
हे करू नका
- दीर्घकाळ खूप गरम कपडे घालणे
- दीर्घकाळ हात आणि पायात मोजे घालणे
- जंक फूड खाणे
- जास्त झोपणे
- घरात कपडे सुकवणे
- डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे
-----------
कोट
हिवाळ्यात रक्त वाहिन्या गोठण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. हिवाळ्यात कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे स्ट्रेच मार्क्स वाढतात. त्यासाठी चौरस आहारासोबत पाणीही प्यावे.
- डॉ. प्रसाद हलकर्णीकर, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ