आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

sakal_logo
By

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
महागाव-हरळी गट; बालेकिल्ला राष्ट्रवादीचा की कुपेकरांचा याचीच उत्सुकता
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीच्या महागाव-हरळी गटामध्ये नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघाचा समावेश होतो. कुपेकरांचे होम पीच अशी ओळख असलेल्या या गटात माजी आमदार संध्यादेवी कुपेकर आणि आमदार राजेश पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नेसरीचा हा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा आहे की कुपेकरांचा हेच या निवडणुकीत ठरणार असून याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
श्रीमती कुपेकर व पाटील हे दोघेही राष्ट्रवादीचे असले तरी दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधातील आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. दुसऱ्‍या क्रमांकाची म्हणजेच ५८६८ मते महागाव-हरळी गटात आहेत. गटाला महागाव-हरळी हे नाव असले तरी यामध्ये बहुतांशी गावे नेसरी जि. प. मतदारसंघातील आहेत. आता गोडसाखर निवडणुकीत श्रीमती कुपेकर, त्यांचे पुतणे तथा राजकीय विरोधक संग्राम कुपेकर या दोघांसह महागावचे कट्टर विरोधक अप्पी पाटील व प्रकाश पताडे आणि काँग्रेसचे विद्याधर गुरबेसुद्धा आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांच्याच शाहू समविचारी आघाडीच्या व्यासपीठावर एकत्र आलेत. त्यांच्या विरोधात आमदार पाटील व जनता दलाचे श्रीपतराव शिंदे, काँग्रेसचे संग्रामसिंह नलवडे, शिवाजी खोत यांची काळभैरव आघाडी रिंगणात उतरली आहे.
शाहू आघाडीकडून भरमू जाधव (तावरेवाडी), प्रकाश पताडे (महागाव), विद्याधर गुरबे (शिप्पूर) आणि काळभैरव आघाडीतून बाळकृष्ण परीट (हरळी खुर्द), प्रदीप पाटील (वाघराळी) व संदीप शिंदे (सरोळी) यांच्यात थेट लढत होत आहे. याच गटात तारेवाडीचे सुरेश कुराडे अपक्ष आहेत. जाधव, पाटील व शिंदे हे तिघेही नवखे असून पताडे, गुरबे, परीट हे माजी संचालक आहेत. उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच प्रतिष्ठा या गटात पणाला लागल्याचे चित्र आहे. किंबहुना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांतील दुफळीमुळेच या गटातील लढतीला विशेष महत्त्‍व आले आहे. संग्रामसिंह कुपेकर, अप्पी पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे हे एकमेकांचे विरोधक एकाच आघाडीच्या तंबूत आहेत. यामुळेही येथील लढतींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
------------------
* अप्पींचे सुपुत्र संस्था गटातून
महागावच्या अप्पी पाटील यांचे सुपुत्र सोमनाथ हे या निवडणुकीत शाहू आघाडीतर्फे संस्था गटातून सभासदांसमोर जात आहेत. त्यांच्याविरोधात काळभैरव आघाडीकडून शिवाजी खोत आहेत. संस्था गटात २४० मतदारसंख्या असून अधिकाधिक मते मिळवण्यासाठी दोन्ही आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत.
-------------------
* गतवेळचे विजयी उमेदवार व मते
- विद्याधर गुरबे : ८०६५
- प्रकाश पताडे : ८०६३
- दीपकराव जाधव : ७७८०