धुरांडे पेटले पण, गळिताला मिळेना गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुरांडे पेटले पण, गळिताला मिळेना गती
धुरांडे पेटले पण, गळिताला मिळेना गती

धुरांडे पेटले पण, गळिताला मिळेना गती

sakal_logo
By

59992
--------------------------
धुराडे पेटले, पण गळिताला मिळेना गती
‘आजरा साखर’चे चित्र ः हंगाम लांबणार, व्यवस्थापनासमोर वाढल्या अडचणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ४ ः परतीच्या पावसाने ऊस गळीत हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. कारखान्यांची वेळेत धुराडी पेटूनही गळिताला पुरेशी गती मिळालेली नाही. शिवारातील ओलावा हटलेला नसल्याने ऊस तोडणीवर परिणाम झाला आहे. आजरा कारखान्याचे निम्म्या क्षमतेने गाळप सुरू आहे. कारखानदारीमध्ये सर्वच ठिकाणी अशीच स्थिती असल्याने यंदाचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनासमोर अडचणी वाढणार आहेत.
आर्थिक अरिष्टात सापडेला आजरा साखर कारखाना गतवर्षी सुरू झाला. यंदा कारखान्याने साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर बॉयलर पेटवून हंगामास सुरवातही झाली. मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने बाहेरच्या टोळ्या येऊनही ऊस तोडणी कूर्मगतीने सुरू झाली आहे. गत आठ दिवसांत पावसाने उसंत घेतली असली, तरी शेत-शिवारातील ओलावा कायम आहे. याचा परिणाम गळीत हंगामावर झाला आहे. त्यातच दिवाळीनंतर तालुक्यात भात, नागली, भुईमूग काढणीत बळिराजा व्यस्त झाला आहे. त्यामुळे त्याचेही ऊसपिकाकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिकांच्या ऊस तोडणी टोळ्या सक्रिय झालेल्या नाहीत.
आजरा तालुक्यात चार हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर ऊसपीक आहे. त्यामुळे आजरा साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सव्वातीन लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. आजरा कारखान्याकडे कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील अशा दहा हजार हेक्टरवरील उसाची नोंद झाली आहे. या उसाची क्रमपाळीने उचल करण्यासाठी तोडणी यंत्रणा कार्यान्वित होणे गरजेचे आहे. यंदा कारखान्याने साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवर्षी कारखाना सुरू करण्यास उशीर झाला. त्याचबरोबर अन्य कारणांमुळे साडेतीन लाख टन गाळप झाले. यंदा अधिक एक लाख टन गाळपाचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने ठेवले आहे. कारखाना आर्थिक अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी अधिकाधिक गाळप करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापनाने नियोजन केले आहे. मात्र परतीच्या पावसाने कारखाना व्यवस्थापनाच्या नियोजनावर विरजण पडले आहे. जमिनीतील ओलावा हटल्याशिवाय पूर्ण क्षमतेने कारखाना सुरु होणे कठीण बनले आहे.
---------
दृष्टीक्षेप
- ‘आजरा साखर’कडे २८१ बीडची यंत्रणा, तर २४५ स्थानिक यंत्रणा
- साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
- प्रतिटन ३ हजार दर जाहीर
- कारखाना कार्यक्षेत्रात सव्वातीन लाख ऊस उपलब्ध
- चंदगड, गडहिंग्लज परिसरातील ऊस पिकावर अवलंबित्व
- ‘आजऱ्या’सह ‘संताजी घोरपडे’, तांबाळेतील ऊस तोडणी टोळ्या कार्यरत