चोरलेले ८० लाख हवालातील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरलेले ८० लाख हवालातील
चोरलेले ८० लाख हवालातील

चोरलेले ८० लाख हवालातील

sakal_logo
By

(फोटो - ६०१९६, ६०१९७, ६०१९८, ६०१९९, ६०२००, ६०२०१, ६०२०२)

60127
कोल्हापूर ः सांगलीच्या सराफाकडील रक्कम लुटल्याप्रकरणी सातजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.

चोरलेले ८० लाख हवालातील
तपासातून निष्पन्न; सात जणांना अटक, १८ लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः सांगली जिल्ह्यातील व्यावसायिकाची लुटलेली ८० लाखांची रक्कम हवाला व्यवहारातील आहे. ही रक्कम नऊजणांनी कट रचून चोरली. यातील सात जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १७ लाख ९८ हजार रुपये रोख आणि तीन मोटारसायकल, ८ मोबाईल, असा सुमारे १९ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजून दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘धनाजी आनंदा मगर (रा. नागाव, जि. सांगली) १९ ऑक्टोबरला कोल्हापूर येथे आले होते. त्यांनी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक परिसर, गवत मंडई, तावडे हॉटेल, गांधीनगर येथील काही व्यापाऱ्यांकडून हवालाची रक्कम जमा केली. त्यानंतर ते गांधीनगरमधील हवाला व्यवहार करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडे गेले. तेथून ८० लाख रुपयांची रोकड घेऊन निघाले. मुक्त सैनिक वसाहत येथे त्यांना चौघांनी अडवले. त्यांनी आम्ही प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी केली. चौघांनी मगर यांना शिरोली एमआयडीसी येथे नेले. तेथे त्यांच्याकडील ८० लाखांची रोकड घेऊन चौघे पसार झाले, असे मगर यांनी फिर्यादीत म्हटले होते.
श्री. गोर्ले यांनी सांगितले, की तपासादरम्यान, संशयितांपैकी सुकुमार ऊर्फ बबलू चव्हाण (रा. निगवे दुमाला, ता. करवीर) याने साथीदारांच्या मदतीने डल्ला मारल्याचे पुढे आले. तो आणि त्याचे साथीदार संभाजीनगर बसस्थानक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथून सातजणांना ताब्यात घेतले. सुकुमार ऊर्फ बबलू हंबीरराव चव्हाण (वय ३६, रा. उभी गल्ली, लक्ष्मी मंदिराजवळ, निगवे दुमाला, ता. करवीर), संजय अप्पासाहेब शिंदे (४०, रा. गावचावडीजवळ शिरोली पुलाची, ता. हातकणंगले), राहुल बाबूराव मोरबाळे (४७, रा. अंबाबाई मंदिराजवळ जय भवानी गल्ली, हुपरी), राहुल अशोक कांबळे (२७), पोपट सर्जेराव चव्हाण (दोघे रा. मेन रोड, लक्ष्मी मंदिराजवळ, निगवे दुमाला, ता. करवीर), जगतमान बहाद्दूर सावंत (२२, रा. गांधीनगर), रमेश करण सोनार (२५, रा. गांधीनगर, मूळ नेपाळ) यांना पोलिसांनी अटक केली. नरसिम्मू दसू (रा. सांगली) आणि विशाल पवार (सातारा) पसार यांचा पोलिस शोध घेत आहेत.
संशयित संजय शिंदेकडून चोरीतील हिस्सा घेण्यासाठी सातजण संभाजीनगर बसस्थानकात आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सात जणांनी २६ लाख ५० हजार रुपयांची चोरी केल्याचे कबूल केले. उर्वरित रक्कम पसार झालेल्या दोघांकडे असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे, अमोल कोळेकर, सागर कांडगावे, सुनील कवळेकर, वसंत पिंगळे, संदीप कुंभार, नितीन चोथे, ओंकार परब यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. सायबर पथकाचाही यामध्ये सहभाग होता.

मालकाला धडा शिकवण्याचा इरादा
गांधीनगरमधील ज्या दुकानात हवालाचा व्यवहार चालायचा, त्याचा मालक आणि संजय शिंदे परिचित आहेत. तो संजयना नेहमी पैशांबद्दल बोलायचा. ‘मैं करोडो मे सोता हूँ’, असे तो सांगायचा. संतोषने प्राप्तिकर विभागाकडे तक्रारही केली होती. मात्र, यामध्ये पुढे काही झाले नाही. त्यामुळे त्याने मालकाला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यातून ही चोरी करण्यात आली, अशी माहिती गोर्ले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नक्की रक्कम किती?
मगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ८० लाखांची रक्कम चोरीला गेली. संशयितांनी आम्ही २६ लाख ५० हजार रुपये चोरल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेमकी रक्कम चोरीला गेली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मगर यांनी आपण त्या दिवशी शहरातील व्यापाऱ्यांकडून एक कोटी ३९ लाख १३ हजार रुपये स्वीकारले होते. त्याचे काय झाले, हाही तपासाचा भाग आहे. मगर यांची फिर्याद संशयास्पद असून त्याचाही तपास पोलिस करत असल्याचे गोर्ले यांनी सांगितले.