सलग दोन महिने नाट्कांची पर्वणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलग दोन महिने नाट्कांची पर्वणी
सलग दोन महिने नाट्कांची पर्वणी

सलग दोन महिने नाट्कांची पर्वणी

sakal_logo
By

लोगो- मुखवटे
...............

सलग दोन महिने मिळणार नाटकांची पर्वणी
सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे स्वागतही नाट्य जल्लोषानेच

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः यंदाच्या सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे स्वागतही कोल्हापूरकर नाट्य जल्लोषानेच करणार आहेत. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीबरोबरच बालनाट्य स्पर्धा आणि त्यानंतर यंदा कामगार कल्याण केंद्राच्या पुणे विभागीय स्पर्धेची प्राथमिक फेरीही येथे रंगणार आहे. साहजिकच तब्बल दोन महिने कोल्हापूरकरांना आशयघन नाटकांची पर्वणी मिळणार आहे.
दरम्यान, राज्यभरात पंधरा नोव्हेंबरला राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरींना प्रारंभ होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली असली तरी येथील स्पर्धेला मात्र २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. याबाबतचे अंतिम वेळापत्रक चार दिवसांत जाहीर होणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातच या तीन्ही स्पर्धा होणार आहेत.
राज्य नाट्य स्पर्धेला सर्वाधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवणारे केंद्र अशी येथील केंद्राची ओळख गेली काही वर्षे झाली आहे. साहजिकच येथील केंद्रावर वीसहून अधिक प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सादर होतात. यंदाही अठरा ते वीस संस्थांचा प्रवेश निश्चित झाला असून, तितके प्रयोग सादर होण्याची शक्यता आहे. शहरातील विविध संस्थांबरोबरच यंदा जिल्ह्यातील काही संस्थांचा सहभागही लक्षणीय आहे. स्पर्धा केवळ पंधरा दिवसांवर आल्याने आता सहभागी संघांच्या सराव तालमींना वेग आला आहे. या स्पर्धेनंतर कोल्हापूर व सांगली केंद्राची बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीही येथे रंगणार असून, यानिमित्ताने शाळकरी मुलांचा नाट्य जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.

चौकट
‘कामगार कल्याण’ची यंदाही स्पर्धा
कामगार कल्याण केंद्रांसाठीच्या नाट्य स्पर्धेची पुणे विभागाची प्राथमिक फेरी तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच येथे रंगली. त्यानंतर कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नाही; मात्र यंदाही या स्पर्धेचे बिगुल वाजले असून, प्राथमिक फेरी कोल्हापुरातच रंगणार आहे. दोन जानेवारीपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून, पुणे विभागातील वीसहून अधिक कामगार कल्याण केंद्रांचे संघ स्पर्धेत नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. एकूणच २१ नोव्हेंबर ते २० ते २२ जानेवारीदरम्यान अशी तब्बल दोन महिने नाटकांची पर्वणी कोल्हापूरकरांना मिळणार आहे.