मराठी रंगभूमी दिन विशेष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी रंगभूमी दिन विशेष
मराठी रंगभूमी दिन विशेष

मराठी रंगभूमी दिन विशेष

sakal_logo
By

लोगो- मराठी रंगभूमी दिन, मुखवटे
............

सामाजिक संस्थांचे हौशी मंचावर ब्रॅंडिंगही
‘तिसरी घंटा’वरून वाढणार संवाद; राज्य नाट्य स्पर्धेत जाणीव चॅरिटेबल ट्रस्टची एंट्री

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः शासनाच्या स्पर्धेत प्रवेशिका सादर करताना नोंदणीकृत संस्था ही एक अट आहे. मात्र, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे, या उद्देशानेही आता राज्य नाट्य स्पर्धेत विविध सामाजिक संस्था उतरू लागल्या आहेत. व्यसनमुक्तीसाठी कार्यरत जाणीव चॅरिटेबल ट्रस्टने यंदाच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून ‘द केअर टेकर’ या नाटकाचा प्रयोग ही टीम सादर करणार आहे.
व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील जाणीव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रविदर्शन कुलकर्णी या संस्थेत सध्या कार्यरत आहेत. त्यांनी संस्थेच्या बॅनरखाली यंदाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांच्याच ‘द केअर टेकर’ या नाटकाचा प्रयोग ही मंडळी सादर करणार आहेत. त्याच्या सराव तालमींनाही वेग आला आहे. संस्थेच्या बॅनरखाली प्रयोग होत असला आणि ते सादर करणारे कलाकार संस्थेतील नसले तरी संस्थेच्या कामाला पाठबळ देणारे हितचिंतक आहेत, हे नक्की. श्री. कुलकर्णी सांगतात, ‘‘जाणीव ट्रस्टच्या माध्यमातून २००७ पासून मनोबल व्यसनमुक्ती केंद्र चालवले जाते. सध्या हे केंद्र देवाळे परिसरात असले तरी महिन्याला साठ ते सत्तर अल्कोहोलिक रुग्णांसाठी ते वरदान ठरते आहे. स्पर्धेच्या माध्यमातून हे काम अधिक लोकांपर्यंत पोचेल आणि एकूणच व्यसनमुक्तीच्या कामाला आणखी चालना मिळेल, असे नक्कीच वाटते.’’
दरम्यान, गेल्या वर्षी सावली केअर सेंटरच्या मेरिड इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातूनही ‘नेटवर्क २४ बाय ७’ हे नाटक स्पर्धेत होते. संस्थेचे एकूणच काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याचा फायदा झाल्याचे ‘सावली’चे किशोर देशपांडे यांनी सांगितले.

चौकट
नाटक एक प्रयोगशाळा...
रंगभूमी ही एक जगण्याची प्रयोगशाळा असल्याचे म्हटले जाते. त्यातूनच हौशी रंगभूमीवर सतत वेगवेगळे प्रयोग होत असतात. कोल्हापूरकरांनी हौशी रंगभूमीची परंपरा जपतानाच नेहमीच सामाजिक बांधिलकीचेही भान जपले आहे. त्यातूनच प्रत्येक वर्षी विविध प्रयोग येथे होतात आणि राज्य नाट्य स्पर्धा त्यासाठी हक्काचे व्यासपीठ राहिले आहे.

चौकट
तरुणाईचे असेही पुढचे पाऊल
हौशी व व्यावसायिक रंगभूमीवरील तरुणाईने आता पुढचे पाऊल टाकले आहे. यंदाच्या रंगभूमी दिनानिमित्त ही मंडळी ‘तिसरी घंटा’या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी हे खास पेज तयार झाले आहे. कोल्हापूर परिसरातील नाटकांची अपडेटस या ग्रुपच्या माध्यमातून मिळतील. नाटकांच्या जाहिराती, प्रसिद्धी, काही मुलाखती, सादरीकरणही या ग्रुपवर होईल. एकूणच वाढलेल्या सोशल मीडियाच्या वापराच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना पुढे आली आहे.