क्रीडा प्रशालेत रग्‍बीला मिळाला मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा प्रशालेत रग्‍बीला मिळाला मुहूर्त
क्रीडा प्रशालेत रग्‍बीला मिळाला मुहूर्त

क्रीडा प्रशालेत रग्‍बीला मिळाला मुहूर्त

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

शिंगणापूर क्रीडा प्रशालेत रग्‍बीला मिळाला मुहूर्त
---
दोन वर्षांच्या प्रयत्‍नांनंतर यश, ‘सकाळ’चा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ५ : जिल्‍हा परिषदेच्या शिंगणापूर क्रीडा प्रशालेत दोन वर्षांनी रग्‍बी खेळास सुरुवात झाली आहे. शिंगणापूर शाळेत रग्‍बी खेळ सुरू करावा, यासाठी ‘सकाळ’ने पाठपुरावा केला. त्याला आज यश आले. शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यां‍ची आडमुठी भूमिका व अंतर्गत विरोध, यामुळे रग्‍बी खेळ सुरू करण्यास विलंब झाला. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी रग्बी सुरू करण्याबाबत ठाम भूमिका घेतल्याने या खेळाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन दिवसांपासून शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील मुले या खेळात सहभागी झाली. पुढील वर्षी रग्‍बीसाठी स्‍वतंत्र बॅटरी टेस्‍ट घेतली जाणार आहे.
चार वर्षांपासून शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील विविध विषय चर्चेला येत आहेत. मॅट घोटाळ्यानंतर ही शाळा अधिकच चर्चेत आली. शाळेतील क्रीडा नैपुण्यापेक्षा इतर बाबींचीच चर्चा वाढत चालली आहे. या सर्वांचा परिणाम शाळेच्या क्रीडा कामगिरीवर होतो. अनेक स्‍पर्धांमध्ये येत असलेले अपयश, ठराविक खेळातच होत असलेली प्रगती यामुळे शिंगणापूर शाळेत नेमके चाललेय काय, असा प्रश्‍‍न पडला. सध्या जिल्‍ह्यात रग्‍बी खेळाचे वातावरण चांगले आहे. दरवर्षी अनेक मुले ही राज्याकडून तसेच देशाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळतात. त्यात खेळाडूंना चांगले यश मिळत आहे.

रग्‍बी खेळात कोल्‍हापूर जिल्‍ह्याचा दबदबा वाढत आहे. त्यातही ग्रामीण भागातून येणाऱ्या‍ मुलांची कामगिरी वाखणण्याजोगी आहे. त्यामुळेच या शिंगणापूर क्रीडा प्रशालेत रग्‍बी खेळ सुरू करण्याची मागणी होत होती. मात्र, दोन वर्षे कधी पदाधिकाऱ्यां‍नी, तर कधी अधिकाऱ्यां‍नी चालढकल केली. ‘सकाळ’ने मात्र रग्‍बी खेळ सुरू करण्याचा सातत्याने आग्रह धरला. यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले. यात खेळाचे सादरीकरण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी चव्‍हाण यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिला. त्यामुळेच आज शिंगणापूर क्रीडा प्रशालेत रग्‍बी खेळाचा समावेश झाला आहे. रग्‍बीचे कोच म्‍हणून दीपक पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.