क्षय रुग्ण संख्या पूर्वपदावर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षय रुग्ण संख्या पूर्वपदावर!
क्षय रुग्ण संख्या पूर्वपदावर!

क्षय रुग्ण संख्या पूर्वपदावर!

sakal_logo
By

क्षयरुग्ण संख्या पूर्वपदावर!
कोरोना काळात आली होती घट; खबरदारी घेणे टाळल्याचा परिणाम
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : कोणतीही आपत्ती नुकसानकारकच. पण, ती बरेच काही शिकवून जाते. फक्त त्यातून आपल्याला शिकता आले पाहिजे. ते नाही जमले तर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ असा प्रकार होतो. क्षयरुग्णांच्या (टीबी) जिल्ह्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास नेमके हेच झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात क्षयरुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली होती. मास्कसह सोशल डिस्टन्सिंग पथ्यावर पडले होते. मात्र, कोरोना हटला आणि वर्षभरात क्षयरुग्णांची संख्या पूर्वपदावर गेली आहे. लोकांनी आवश्यक खबरदारी घेणे टाळल्यामुळे ही परिस्थिती उद्‌भवल्याचे स्पष्ट होत आहे.
संसर्गजन्य आजारापैकीच एक क्षयरोग आहे. क्षयरुग्णाच्या शिंकण्या-खोकण्यातून या आजाराचा संसर्ग अधिक वेगाने पसरतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना याचा अधिक धोका असतो. दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कसह सोशल डिस्टन्सिंगची सक्ती करण्यात आली. कोरोनापासून दूर राहण्यासाठी ही काळजी घेतली असली तरी अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा क्षयरुग्णांची संख्या कमी होण्यासाठी झाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव नसतानाच्या काळात म्हणजे सन २०१९ च्या तुलनेत सन २०२० मध्ये रुग्णसंख्या हजाराने घटली होती. गतवर्षी सप्टेंबरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट राहिली होती. या वर्षातही जवळपास साडेपाचशेने रुग्ण कमी झाले होते.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबल्यानंतर लोकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केले. साहजिकच श्वसनाशी संबंधित संसर्गजन्य आजारांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा क्षयरुग्णांची संख्या ऑक्टोबर अखेरीसच गतवर्षांच्या रुग्णसंख्येपर्यंत पोचली आहे. वर्ष संपण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. एकूण रुग्णांच्या सरासरीचा विचार केला, तर वर्षअखेरीस किमान ४५० ते ५०० रुग्णांची भर पडू शकते. यावरून क्षयरुग्णांच्या संख्येची पूर्वपदाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
--------------
चौकट...
जिल्ह्यातील क्षय रुग्ण...
-----------
वर्ष*शासकीय रुग्णालय*खासगी रुग्णालय*एकूण
२०१९*२४८३*५५६*३०३९
२०२०*१६८२*३४१*२०२३
२०२१*२०४९*४२७*२४७६
२०२२ (२ नोव्हेंबरपर्यंत)*२००१*४२८*२४२९
-------------
कोट
सर्वसाधारणपणे लोकांनी शिंकताना, खोकताना काळजी घेणे आवश्यक आहे. कुठेही थुंकणे टाळले पाहिजे. यातून आजारांच्या संसर्गाची शक्यता वाढते. दानशूर व्यक्ती-संस्थांनी निक्षयमित्र बनावे. क्षयमुक्तीसाठी हातभार लावावा.
- डॉ. उषा कुंभार, जिल्हा क्षयरोग अधिकारी, कोल्हापूर