सद्वर्तनाचा विचार पेरत उजळते एकेक पणती...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सद्वर्तनाचा विचार पेरत उजळते एकेक पणती...!
सद्वर्तनाचा विचार पेरत उजळते एकेक पणती...!

सद्वर्तनाचा विचार पेरत उजळते एकेक पणती...!

sakal_logo
By

60549
सद्वर्तनाचा विचार पेरत उजळते एकेक पणती...!
पंचगंगा घाटावरील लोकोत्सव; सामाजिक संदेश देणाऱ्या कलाविष्काराचे मुक्त व्यासपीठही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : सद्‌गुण, सद्‌भावना, सद्‌वर्तन आणि सद्विचार हीच सुसंस्कृत मनाची बीजे आहेत, असा संदेश देणारी त्रिपुरारी पौर्णिमा. या पौर्णिमेनिमित्त पंचगंगा घाटावर दीपोत्सवाचा सोहळा सजणार आहे. सामूहिक प्रयत्नातून ‘ज्योत से ज्योत’ पाजळत साकार होणाऱ्या या दीपोत्सवाच्या निमित्ताने पंचगंगा घाट हे स्थानिक हौशी कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठच बनले आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ७) रात्रीपासून घाटावर दीपोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून मंगळवारी (ता. ८) पहाटे घाटावर एक्कावन्न हजार पणत्या प्रज्वलित होणार आहेत.

सहा दशकांची परंपरा...
पंचगंगा घाटावरील या सोहळ्याला सहा दशकांची परंपरा आहे. पंचगंगा फ्रेंडस्‌ सर्कलच्या (कै.) अवधूत रेडेकर यांच्या पुढाकाराने हा सोहळा सुरू झाला. गेली दहा-बारा वर्षे हा सोहळा शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या संयोजनाखाली होत असला तरी केवळ जुना बुधवार, शुक्रवार, शनिवार, उत्तरेश्‍वर पेठच नव्हे, तर सारे शहरवाससीय भल्या पहाटे एकवटतात. दीपोत्सवाच्या आधी काही दिवसांपासूनच ही मंडळी घाटाच्या स्वच्छतेपासून ते दीपोत्सवातील अखेरचा दीप शांत होईपर्यंत झटतात. त्यांच्या नेटक्‍या संयोजनातूनच घाटावर मांडली जाणारी पणत्यांची आरास आणि त्यातून दिसणारा तेजाळलेला घाट शहरवासीयांना खुणावतो आणि हजारो कोल्हापूरकरांच्या साक्षीने हा सोहळा सजतो. शीतल चांदण्यांत, बोचऱ्या थंडीत डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा त्यांच्यासाठी वर्षभराची ऊर्जा देतो.

सामाजिक विषयांवर परखडपणे भाष्य
दीपोत्सवाच्या निमित्ताने गेल्या काही घाटावर जणू सुंदर रांगोळ्यांचे प्रदर्शनच भरते. विविध लोककला, मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांसह रंगावलीतील असंख्य प्रकारही येथे पहायला मिळतात. गेल्या चार-पाच वर्षांत थ्रीडी रांगोळ्या आणि सजावटही येथे अनुभवायला मिळते आहे. सर्वात महत्त्‍वाचे म्हणजे ही सारी मंडळी स्वखर्चातून हा कलाविष्कार घडवतात आणि त्यातून ‘लोकल टू ग्लोबल’ विविध सामाजिक प्रश्नांवरही परखडपणे भाष्य करतात. पूर्वी जिथे जागा मिळेल तिथे कलाकार मंडळी रंगावलीचा आविष्कार घडवत. पण, अलीकडच्या काळात हा आविष्कार सर्वांना अगदी सहजपणे पहाता यावा, या उद्देशाने त्याचेही रांगोळ्यांचेही स्वतंत्र नियोजन केले जाते. त्याशिवाय स्थानिक वाद्यवृंद हा सारा माहोल भल्या पहाटेच्या प्रहरी अविट गीतांनी अधिक स्वरांकित करतात. विविधरंगी लेसर शोचा झगमगाट वाढला असला तरी त्यातून पणत्यांच्या प्रकाशोत्सवावर परिणाम होणार नाही आणि त्याचबरोबर घाटावर अस्वच्छता होणार नाही, याचीही खबरदारी आवर्जुन घेतली जाते.
---------------
चौकट
आम्ही चालवू हा पुढे वारसा...
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सजणाऱ्या दीपोत्सवाच्या सोहळ्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. पूर्वी काही मंदिरात होणारा हा सोहळा पुढे सार्वजनिक पातळीवरही साजरा होत असून नवी पिढीही ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा...’ असे अभिमानाने सांगत त्यात सक्रिय सहभागी होत आहे. कोल्हापुरात पंचगंगा घाटावर मुख्य सोहळा होत असला तरी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, कात्यायनी मंदिर, राजाराम बंधारा, वडणगे पार्वती मंदिर, शिंगणापूर आदी ठिकाणीही हा सोहळा तितक्याच पारंपरिक उत्साहात साजरा होतो.