गड-खून फॉलोअप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-खून फॉलोअप
गड-खून फॉलोअप

गड-खून फॉलोअप

sakal_logo
By

दुहेरी खूनप्रकरणी
पती-पत्नीला अटक

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : तुप्पूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथे मेंढपाळ व त्याच्या चार वर्षीय मुलाच्या दुहेरी खूनप्रकरणी येथील पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली. बिराप्पा मारुती शंकरट्टी व सत्यव्वा ऊर्फ दडव्वा बिराप्पा शंकरट्टी (दोघेही रा. जोडकुरळी, ता. चिक्कोडी) अशी त्यांची नावे आहेत. खुनाच्या घटनेनंतर दोघेही फरार झाले होते. पोलिसांनी त्यांना आज सकाळी दहाच्या सुमारास कमतनूर गेट (ता. हुक्केरी) येथून ताब्यात घेतले.
जोडकुरळी येथील मेंढपाळांनी तुप्पूरवाडी येथे आपल्या बकऱ्यांचा तळ ठोकला होता. शुक्रवारी (ता. ४) सकाळी साडेदहाच्या सुमारास मेंढपाळ केंच्चापा मारुती हारके व त्यांचा मुलगा शंकर केंच्चापा हारके यांच्या निर्घृण खुनाची घटना घडली होती. या दुहेरी खुनामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. खुनाच्या घटनेनंतर शेजारच्या तळावरील बिराप्पा व त्याची पत्नी सत्यव्वा ऊर्फ दडव्वा यांनी पलायन केले होते. तर, मृत केंच्चापा यांच्या पत्नी श्रीदेवी यांनी किरकोळ कारणावरून गुरुवारी (ता. ३) रात्री झालेल्या वादाचा मनात राग धरून बिराप्पा व सत्यव्वा यांनी आपल्या पती व मुलाचा खून केल्याची फिर्याद दिली होती.
दरम्यान, पोलिसांनी खुनाची घटना उघडकीस आल्यापासून संशयितांचा शोध सुरू केला होता. संशयित कर्नाटकातील असल्याने सीमाभागावर लक्ष केंद्रित केले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास संशयित बिराप्पा व सत्यव्वा ऊर्फ दडव्वा यांना कमतनूर गेट येथून ताब्यात घेतले. दोघांनाही अटक करण्यात आली असून, उद्या (ता. ६) न्यायालयात हजर केले जाणार आहे.