ऊस वाहतुकदार मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस वाहतुकदार मोर्चा
ऊस वाहतुकदार मोर्चा

ऊस वाहतुकदार मोर्चा

sakal_logo
By

60495
....
ऊसतोडणी वाहतूकदार संघटनेचा मोर्चा

विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : ऊस तोडणी कामासाठी साखर कारखान्यांकडून अनामत रक्कम घेऊन काम करण्यास टाळटाळ करीत फसवणूक करणाऱ्या तसेच दहशत दाखवणाऱ्या मुकादम व मजुरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ऊसतोडणी वाहतूकदार संघटनेतर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतुकीची यंत्रणा साखर कारखान्याला पुरविण्यासाठी मुकादम नोटरी कराराआधारे लाखो रुपये उचल घेतात. कारखाने सुरू होण्यापूर्वी कारखान्यांच्या टोळ्या तोडणी कार्यक्रमानुसार ऊस कारखाना कार्यक्षेत्रात येतात. ऊसतोड सुरू होते. मुकादम व मजूर हे आपल्या कामातून उचल रकमेची परतफेड करतात, अशी पूर्वी पासूनची पद्धत आहे. मात्र गेल्या काही वर्षात काही मोजके मुकादम, खोटे मजूर पुढे आणतात. बनावट कागदपत्रे तयार करतात. यात रहिवासी दाखले, धनादेश, ओळखपत्रे अशी कागदपत्रे बनावट केली जातात. त्या आधारे कारखान्याकडून रक्कम उचल घेतात आणि निघून जातात. अशा वेळी संबंधित मुकादमाचा शोध घेण्यासाठी साखर कारखाने व वाहतूकदारांचे पथक मुकादमांच्या गावी पाठवले जाते. तेव्हा मुकादमांकडून संबंधित कारखान्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण होते. अशीच मारहाण ऊस तोडणी वाहतूकदारांनाही होते. तेव्हा तेथील स्थानिक पोलिसांकडून संरक्षण किंवा सहकार्य मिळत नाही. त्यामुळे अशी फसवणूक व दहशतीच्या प्रकारांना पायबंद बसावा.
वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, प्रवीणकुमार शेट्टी, दिग्विजय जगदाळे, अशोक कुबेर, विठ्ठल पाटील, विद्याधर पाटील आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
.....

निवेदनातील अन्य मागण्या

मुकादम, मजुरांकडून फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने धोरण ठरवावे.
फसवणूक करणाऱ्यांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून घ्यावा.
ऊस वाहतूकदार व मुकादम यांची नोंदणी करून घ्यावी.
फसवणूक सिद्ध झाल्यास संबंधित मुकादमाची संपत्ती जप्त करून उचल रक्कम वसूल करावी.