विविध कलाविष्कारांनी रंगभूमी दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध कलाविष्कारांनी रंगभूमी दिन साजरा
विविध कलाविष्कारांनी रंगभूमी दिन साजरा

विविध कलाविष्कारांनी रंगभूमी दिन साजरा

sakal_logo
By

60560
कोल्हापूर ः देवल क्लबतर्फे सादर झालेल्या ‘बे दुणे काय मास्तर?’ या एकांकितेतील एक प्रसंग.
१60561
कोल्हापूर ः मराठी रंगभूमी दिनानिमित्त फिनिक्स ॲक्टिंग स्कूलतर्फे विविध कलाविष्कार सजले. त्यातील एक प्रसंग.

विविध कलाविष्कारांनी रंगभूमी दिन साजरा
लघुनाटिका, एकांकिकांसह लोकनृत्य आणि बॉलिवूड डान्सही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : विविध कलाविष्कारांनी आज मराठी रंगभूमी दिन साजरा झाला. लघुनाटिका, एकांकिका, लोकनृत्यासह बॉलिवूड डान्स सादर करत रंगभूमीला कलाकारांनी अभिवादन केले. दरम्यान, सोशल मीडियालाही रंगभूमी दिनाची झालर लाभली. या दिनाचे औचित्य साधून येथील तरुण रंगकर्मींनी ‘तिसरी घंटा’ या नावाने फेसबुक पेज सुरू केले असून त्यावरून रंगभूमीविषयक संवादाला आजपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या पेजला मोठा प्रतिसाद मिळाला. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कलाकार व तंत्रज्ञांतर्फे नटराज पूजन झाले.
फिनिक्स ॲक्टिंग स्कूलच्या वतीने झालेल्या कार्यक्रमाला नटराज पूजनाने प्रारंभ झाला. दिवाळी सणाचे महत्त्व सांगणारे ‘बंध नात्याचे’ तर आई-वडील आणि कुटुंबीयांप्रती दुरावत चाललेल्या आजच्या पिढीला नात्यांचं महत्त्व सांगणारे ‘पाझर’ या लघुनाटिकांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. गडकिल्ल्यांची होत असलेली हेळसांड ‘गड आला पण...’ या लघुनाटिकेतून मांडली गेली. राधा, कृष्ण आणि रुक्मिणी यांच्यातील नाजूक नाते सांगणारी ‘राधेकृष्ण’ ही पौराणिक लघुनाटिका, रंगभूमी दिनाचे महत्त्व सांगणारी ‘रंगीत तालीम’ ही लघुनाटिकाही सादर झाली. त्याशिवाय लोकनृत्य, बॉलिवूड डान्सही सादर झाले. ‘फिनिक्स’चे संस्थापक, अभिनेता संजय मोहिते, डॉ. राजश्री खटावकर, अभिनेत्री केतकी पाटील, विनिता काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देवल क्लबतर्फे झालेल्या कार्यक्रमात रोहित पोतनीस दिग्दर्शित ‘बे दुणे काय मास्तर?’ ही एकांकिका सादर झाली. शार्दूल निंबाळकर लिखित या एकांकिकेचे सादरीकरण संस्थेच्या तरुण रंगकर्मींनी केले. तत्पूर्वी डॉ. शीतल धर्माधिकारी यांच्या विद्यार्थिनीनी ‘संगीत शाकुंतल’ नाटकातील नांदी सादर केली. त्यानंतर ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकातील गीताचे सादरीकरण केले. डॉ. धर्माधिकारी यांनी ‘संगीत सौभद्र’ मधील ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाट्यगीत सादर केले. कृष्णात माळवदे यांची तबला साथ होती.