मोबदला मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबदला मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार
मोबदला मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार

मोबदला मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार

sakal_logo
By

60636
------------------------------
मोबदला मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार
महामार्ग बाधित शेतकऱ्यांची परिषद : अकरा ठराव केले मंजूर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांची लढा परिषद झाली. महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळत नाही, तोपर्यंत एकजुटीने लढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. परिषदेत अकरा ठराव एकमताने मंजूर केले. धरणग्रस्त चळवळीचे राज्य संघटक अशोक जाधव अध्यक्षस्थानी होते. शेतकरी सभेचे राज्य संघटक दिगंबर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील भडगाव मार्गावरील राम मंदिरात ही परिषद झाली.
श्री. कांबळे म्हणाले, ‘‘बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता महामार्गाचे काम करणाऱ्यांचा कुटिल डाव हाणून पाडला पाहिजे. महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी संघटनेच्या पाठीशी नेहमी आहोत.’’ श्री. जाधव म्हणाले, ‘‘धरणग्रस्तांनी शेवटपर्यंत लढा दिला. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी लढा द्यावा.’’ संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत न्यायासाठी एकजुटीने लढले पाहिजे, असे मत संजय तर्डेकर व्यक्त केले.
शिवाजी इंगळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी लढ्यापाठीमागील भूमिका मांडली. महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी परिषदेत अकरा ठराव मांडले. बाधित शेतकऱ्यांना एकरी कमीत कमी दीड कोटी रुपये किंवा बाजारभावाच्या दसपट मोबदला द्यावा, बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही, तोपर्यंत बाधित गावाच्या हद्दीत महामार्गाचे काम सुरू करू नये, यासह सर्व ठरावांना मंजुरी दिली.
शंकर डोंगरे, विशाल गुरव, रवींद्र जाधव, कल्लाप्पा कांबळे, जयश्री संकपाळ, शारुबाई गवळी, महादेव शिंगे, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते. जयवंत थोरवतकर यांनी आभार मानले.