‘गोडसाखर’साठी ६९.१८ टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोडसाखर’साठी ६९.१८ टक्के मतदान
‘गोडसाखर’साठी ६९.१८ टक्के मतदान

‘गोडसाखर’साठी ६९.१८ टक्के मतदान

sakal_logo
By

६०७७०
गडहिंग्लज : गोडसाखर कारखान्यासाठी रविवारी शांततेत मतदान झाले. एम. आर. हायस्कूलच्या केंद्रावर संस्था गटातील मतदार फेटे बांधून आले होते. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

फोटो क्रमांक : gad६१४.jpg
चन्नेकुप्पी : गोडसाखर कारखान्यासाठी रविवारी मतदान झाले. येथील केंद्रावर दोन गटांत झालेल्या वादानंतर केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला होता. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

‘गोडसाखर’साठी ६९.१८ टक्के मतदान
उद्या मतमोजणी; संस्था गटात २३७ जणांनी बजावला हक्क

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीसाठी आज शांततेत ६९.१८ टक्के मतदान झाले. सकाळी आठ ते पाचपर्यंत २५ हजार ९१ पैकी १७ हजार ३६०, तर संस्था गटात २४० पैकी २३७ सभासदांनी मतदान केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप व सहायक अधिकारी अमित गराडे यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी (ता. ८) गांधीनगरातील पॅव्हेलियन हॉलमध्ये सकाळी आठपासून मतमोजणी होणार आहे.
शाहू समविचारी शेतकरी विरुद्ध काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. १९ जागेसाठी ४३ उमेदवार रिंगणात असून पाच अपक्ष नशीब आजमावत आहेत. आठ दिवस प्रचाराची राळ उठल्यानंतर नेते, उमेदवार व समर्थकांनी आज मतदानासाठी कंबर कसली. गल्लीबोळ, माळरान आणि शेतवडीतीसह आजाराने अंथरुणावर असलेल्या सभासदांनाही मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. नातेवाईक व कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मतदान अधिकाऱ्‍यांनीही अशा मतदारांच्या वाहनापर्यंत येऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली.
तालुक्यातील ७४ केंद्रांवरील ७०० हून अधिक कर्मचाऱ्‍यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. सकाळी सातपासूनच उमेदवार व कार्यकर्ते केंद्रावर पोहचले होते; परंतु, सकाळच्या सत्रात मतदार कमी आणि समर्थकांची गर्दी अधिक असे चित्र होते. मतदार सोयीच्या वेळेत मतदान करून जात असल्याने बहुतांश केंद्रावर रांगा दिसल्या नाहीत. ज्या गावात उमेदवार आहेत, तेथील केंद्रावर मात्र चुरशीने सकाळपासूनच रांगा होत्या. किरकोळ वादावादी वगळता शांततेत मतदान झाले. शाहू आघाडीचे आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, संग्राम कुपेकर यांनी तर काळभैरव आघाडीचे नेते आमदार राजेश पाटील, श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे, स्वाती कोरी, शिवाजी खोत यांनी विविध केंद्रांवर भेटी देऊन मतदानाची माहिती घेतली. आठ दिवस एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करणारे नेते आणि प्रमुख कार्यकर्ते आज मात्र खेळीमेळीत होते. मतदानासाठी पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्यासह एक जलद कृती दलाची एक तुकडी, तीन अधिकारी, ८५ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता.


* नाहीतर मतदारांनाच घेऊन जातो
संवेदनशील चन्नेकुप्पी येथील चव्हाण चुलते-पुतणे एकमेकांच्या विरोधात रिंगणात आहेत. यामुळे मतदानासाठी मोठी ईर्षा होती. केंद्रावर मतदारांना आवाहन करण्याच्या मुद्यावरून दोन गटांत हमरीतुमरी झाली. पोलिस व काही कार्यकर्ते समजावण्याचा प्रयत्न करत होते; परंतु कोणी ऐकायला तयार नसल्याने गोंधळ उडाला. त्याला वैतागून एका मतदाराने ‘तुम्ही वाद थांबवा, नाहीतर सगळ्याच सभासदांना मतदान न करता बाहेर घेऊन जातो’ असा विनंतीवजा इशारा दिला. गोंधळाने केंद्रावर तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे पोलिसांनी अधिकाऱ्‍यांना पाचारण केले.