दीपोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपोत्सव
दीपोत्सव

दीपोत्सव

sakal_logo
By

हजारो कोल्हापूरकरांच्या साक्षीने दीपोत्सव
---
शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे पंचगंगा घाटावर आयोजन, दोन वर्षांनी सळसळता उत्साह
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः पणत्यांच्या प्रकाशात लख्ख उजळलेला पंचगंगा घाट... नयनरम्य आतषबाजी... विविधरंगी प्रकाशझोतांची साऱ्या परिसराला लाभलेली सुरेल झालर... पहाटेच्या प्रहरी उमटणारे भावसंगीताचे सूर, अशा संमोहित माहोलात आज पहाटे पंचगंगा घाटावर दीपोत्सव सजला. दोन वर्षांनी कोणत्याही निर्बंधाशिवाय हा सोहळा साजरा झाल्याने कडाक्याच्या थंडीतही हजारो कोल्हापूरकरांनी हजेरी लावली. शिवमुद्रा प्रतिष्ठानने आयोजन केले.
दोन वर्षे कोरोनामुळे दीपोत्सवाचा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला. मात्र, यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय हा सोहळा होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोचली होती. काल (ता. ७) सायंकाळपासूनच कोल्हापूरकरांची पावलं पंचगंगा घाटाकडे वळू लागली. कराओके गीतांच्या साक्षीने घाटावर दीपोत्सवाच्या तयारीला प्रारंभ झाला. रात्री बारानंतर तर सारा माहोलच बदलून गेला. घाटावर मुक्त कलाविष्कार साकारू लागला आणि संस्कारभारतीपासून ते विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या रांगोळ्या सजल्या. पहाटे साडेतीनच्या सुमारास पंचगंगेगेची आरती झाली आणि एकेक पणती प्रज्वलित होऊ लागली. काही वेळातच सारा घाट परिसर ५१ हजार पणत्यांच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाला. छत्रपती शिवाजी पुलावरून विविधरंगी प्रकाशझोतांनी हा सारा माहोल आणखी प्रकाशित केला. समाधी मंदिर परिसरातील मंदिरे, दीपमाळाही उजळून निघाल्या आणि सारा प्रकाशोत्सव पाहण्यासाठी कोल्हापूरकरही सहकुटुंब एकवटू लागले. याच दरम्यान, अंतरंग वाद्यवृंदाच्या भावसंगीताच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. हजारो कोल्हापूरकरांच्या साक्षीने सकाळी सातपर्यंत हा सोहळा सजला. दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष संदीप देसाई, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपशहरप्रमुख कपिल नाळे यांच्यासह परिसरातील तालीम संस्था, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दीपोत्सवाला प्रारंभ झाला. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे दीपक देसाई, नीलेश जाधव, अक्षय मिठारी, कल्पेश नाळे, अवधूत कोळी, अक्षय मोरे, प्रवीण चौगले, अर्जुन आंबी आदींनी संयोजन केले.

चौकट
भक्तिरसात अवघा रंग एकचि जाहला...
करवीर निवासिनी श्री अंबाबाई, पंढरपूरचा कानडा विठ्ठल, श्री गणेश मंदिर, भगवान शंकर आदींच्या आकर्षक प्रतिकृतीही या सोहळ्याच्या निमित्ताने साकारल्या गेल्या. त्याचसोबत तितकीच साजेशी सजावट करण्यात आली आणि अवघा रंग एकचि जाहला, असेच चित्र घाटावर अनुभवायला मिळाले. हा सारा माहोल ज्येष्ठ कवी अशोक भोईटे यांनी ‘लक्ष दीपांनी पहाट उजळली, पंचगंगा तीरी... त्रिपुरारी चांदण्यात न्हाहते, करवीरची नगरी...’ असा शब्दबद्ध केला.

चौकट
सामाजिक विषयावर मंथन
रांगोळ्यांच्या माध्यमातून लेक वाचवा, फुटबॉल, मराठी अस्मिता, लव्ह जिहाद, पन्हाळगड वाचवूया आदी विषयांवर मंथन झाले. रांगोळ्यांबरोबरच फुलांची आकर्षक सजावटही काहींनी केली. एकाहून अधिक अधिक सरस रांगोळ्यांचा आविष्कार दीपोत्सवाच्या निमित्ताने सजतो. मात्र, त्यात राजकीय भाष्य करणाऱ्या रांगोळ्या नकोत, त्याचवेळी लेसर शोचा वापरही मर्यादित स्वरूपात व्हावा, अशी अपेक्षा यानिमित्त व्यक्त झाली.