कंपनांच्या संघाना फुटणार पालवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंपनांच्या संघाना फुटणार पालवी
कंपनांच्या संघाना फुटणार पालवी

कंपनांच्या संघाना फुटणार पालवी

sakal_logo
By

कंपनांच्या संघाना फुटणार पालवी
एआय़एफएफचा निर्णयाने प्रतिभावान फुटबॉलपटूंना मिळणार हक्काची भाकरी

दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : भारतीय फुटबॉलला अनेक प्रतिभावान खेळाडू देणाऱ्या कंपन्यांच्या संघाना पालवी फुटणार आहे. दशकभरापूर्वी व्यावसायिक संघाच्या निकषांची पुर्तता नसल्याने हे संघ प्रवाहाबाहेर फेकले गेले होते; पण, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) नव्या कार्यकरिणीने या संघाचे भारतीय फुटबॉलमधील योगदान लक्षात घेता त्यांच्यासाठी नव्या स्पर्धेचा निर्णय घेतला आहे. परिणामी, या संघाच्या पुर्नवसनामुळे प्रतिभावंत फुटबॉलपटूंना हक्काची भाकरी मिळणार आहे. याचे फुटबॉल क्षेत्रातून स्वागत होत आहे.

स्वातंत्र्यापूर्वीपासून संस्था, उद्योग समुह तसेच वीज कंपन्या,पोलिस आदींचे फुटबॉल संघ कार्यरत आहेत. खास करून प्रतिभावंत युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्याचे काम अशा संघानी केले. या संघातून पर्दापण करणाऱ्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली. त्यामुळे मातब्बर संघाना गुणवंत खेळाडू पुरविणारी ''पाईप लाईन'' अशीच या संघाची ओळख होती. या संघानी शेकडो खेळाडूंना रोजगार दिला. यामुळे फुटबॉलपटूंसाठी हे संघ हक्काची भाकरी देणारे ठरले होते. मुंबईचा एअर इंडिया, टाटा, केरळचा स्टेट बँक आणि इलेक्ट्रीसिटी बोर्ड, बंगळूरचा हिंदूस्थान एरोनेटिक्स, चेन्नईचा इंडियन बँक, हैदराबाद पोलिस, जेसीटी फगवारा अशा संघाचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल.

दोन दशकापूर्वी संघ भारतीय फुटबॉलमधील अव्वल समजल्या जाणाऱ्या इंडियन लिग (आय लिग) मध्ये सहभागी झाले. स्पर्धेचे स्वरूप लक्षात घेऊन संस्थानी बजेट वाढवून अनेक खेळाडूंना सामावून घेतले. त्यामुळे शेकडो खेळाडूंच्या जीवनाला स्थैर्य मिळाले; पण, दशकापूर्वी अशियाई फुटबॉल महासंघाचे व्यावसायिक संघाचे निकष कंपन्यांचे संघ असल्याने पुर्तता होत नसल्याने आयलिगमधून वगळले. साहजिकच स्पर्धाच नसल्याने संघात मरगळ आली. नव्या खेळाडूंची भरती बंद झाल्याने रोजगार थांबला. या पार्श्वभूमीवर एआयएफएफच्या नव्या स्पर्धेने संस्थाच्या संघाना पालवी फुटून खेळाडूंना रोजगाराचे दारे पुन्हा उघडतील, अशी आशा आहे.

एआयएफ कार्यकारिणी बैठकीत तांत्रिक समितीचे अध्यक्ष आय. एम. विजयन यांनी कंपन्यांच्या संघांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. याबाबत सर्वचजण सकारात्मक आहेत. नव्या स्पर्धेच्या स्वरूपाविषयी नियोजन सुरु आहे."
- मालोजीराजे छत्रपती, सदस्य, एआयएफएफ कार्यकारिणी, दिल्ली

गेल्या काही वर्षापासून संस्था संघाच्या पुर्नवसनाची माजी खेळाडूंची मागणी होती. नव्या निर्णयाने संस्था संघाना जीवदान मिळेल. शासनाने देखील खेळाडूंची भरती वाढवली तर नवोदितांना खेळात करियरसाठी प्रोत्साहन मिळेल.
- शब्बीर अली, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, हैदराबाद