दुपारपर्यंत ताणली उत्कंठा, सायंकाळी जल्लोष! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुपारपर्यंत ताणली उत्कंठा, सायंकाळी जल्लोष!
दुपारपर्यंत ताणली उत्कंठा, सायंकाळी जल्लोष!

दुपारपर्यंत ताणली उत्कंठा, सायंकाळी जल्लोष!

sakal_logo
By

61148
-------------
दुपारपर्यंत उत्कंठा, सायंकाळी जल्लोष!
मतमोजणी केंद्राबाहेरील चित्र : उन्हाच्या चटक्यांसह निकालाने घेतली संयमाची परीक्षा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : प्रचाराचे रान उठलेल्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. केंद्रनिहाय मतमोजणीच्या नियोजनामुळे दुपारपर्यंत कार्यकर्त्यांची उत्कंठा कमालाची ताणली होती. निकालाचा कल स्पष्ट झाल्यामुळे सायंकाळी जल्लोषाचे चित्र होते. मतमोजणी केंद्रापासून सुरु झालेला हा जल्लोष रात्रीपर्यंत गावागावात पोचला.
निकालाच्या ओढीने सकाळ आठपासूनच कार्यकर्त्यांचे पाय गांधीनगरातील पॅव्हेलियन हॉलकडे वळत होते. दहापर्यंत तुरळक गर्दी होती. संस्था गटातील निकालाची साडेनऊला घोषणा होताच उपस्थितांच्या जल्लोषाचा श्रीगणेशा झाला. गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला. मात्र, केंद्रनिहाय मतमोजणीच्या नियोजनामुळे त्यानंतरचा काळ कार्यकर्त्यांच्या संयमाची परीक्षा पाहणारा ठरला. कारण, पहिल्या फेरीचा कल समजण्यास दुपारी दीड-दोन वाजले. अधिकृत निकाल मिळत नसल्याने मतमोजणी प्रतिनिधींकडील अपडेटकडे केंद्राबाहेरील कार्यकर्त्यांचे डोळे लागून होते. नवी घडामोड जाणून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती.
दुपारनंतर ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी परिसर गजबजून गेला. युवा कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून या वातावणात रंग भरला. दिवसभर उन्हाचा चटका वाढूनही कार्यकर्त्यांचा उत्साह कणभरही कमी झाला नाही. आपल्या उमेदवाराला किती मते मिळाली याचा कानोसा घेताना कार्यकर्त्यांची कसरत सुरु होती. यासाठी माध्यम प्रतिनिधी, कार्यालये यांचे दुरध्वनी दिवसभर खणखणत होते. सकाळी घेतलेल्या आघाडीत किती भर पडली याचीच चर्चा उपस्थितांत रंगली होती.
युवक कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षवेधी होता. त्यांच्याकडून घोषणा आणि जल्लोषात केला जात असला तरी अंतिम निकालाची प्रतीक्षा कायम असल्याचे चेहऱ्यावरुन दिसून येत होते. पहिल्या फेरीत समविचारी आघाडीला कल स्पष्ट झाला होता. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परिसरातून काळभैरव आघाडीच्या समर्थकांनी काढता पाय घेतल्याचे दिसून आले. केवळ समविचारीचेच कार्यकर्ते थांबून होते. त्यांना लागलेली अंतिम निकालाची प्रतीक्षा स्पष्टपणे जाणवत होती. दुसऱ्या फेरीतही लीड कायम राहिल काय याबाबत सातत्याने विचारणा केली जात होती.
----------------
* कुठल्या बाजून हाईस...
गोडसाखर निवडणुकीसाठी झालेल्या आघाड्यांच्या रचनेमुळे जवळपास सर्वच पक्षांना फुटीचे ग्रहण लागले. मतमोजणी केंद्रात एका पक्षाचा कार्यकर्ता थोड्या उशीरानेच आला. यावेळी त्याच्या ओळखीच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांने त्याला ''कुठल्या बाजून हाईस ते आधी सांग'' असा प्रश्न केला. यावरुन आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची झालेली अवस्था लक्षात येते.

* पहिल्या फेरीतच कल स्पष्ट
पहिल्या फेरीत ३३ केंद्रांची मतमोजणी झाली. प्रत्येक केंद्राच्या उत्पादक आणि राखीव अशा सर्वच गटांच्या मतपत्रिकांची क्रमाने मोजणी केली. पहिल्या फेरीतच छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या सर्व उमेदवारांनी सुमारे दीड हजार मताधिक्य घेतले. या केंद्रावरील मतांची संख्या उर्वरित केंद्रापेक्षा अधिक होती. पहिल्या फेरीतच निकालाचा कल स्पष्ट झाला अन् समविचारीच्या समर्थकांना जल्लोषाचा मार्ग मोकळा झाला.

जल्लोषाला संधी कमीच मिळाली
यापूर्वीच्या निवडणुकांत गटनिहाय मतमोजणी केली होती. त्यामुळे जसा गटांचा निकाल जाहीर होईल तशी कार्यकर्त्यांना जल्लोषाची संधी मिळाली होती. मात्र, आज दोनच फेरीत सारा कारभार संपवल्याने कार्यकर्त्यांना जल्लोषाची संधी कमीच मिळाली. साहजिकच तणावग्रस्त परिस्थितीचा प्रश्नच निर्माण झाला नाही. निवडणूक यंत्रणेच्या नियोजनाचा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अप्रत्यक्षपणे फायदा झाल्याचे दिसून आले.