रस्ता ठेक्याचा झोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता ठेक्याचा झोल
रस्ता ठेक्याचा झोल

रस्ता ठेक्याचा झोल

sakal_logo
By

रस्ता ठेक्यांचा झोल
भाग ४

..............................
`लाडक्या’ ठेकेदारांमुळे शहर वेठीला

बहुतांश ठेके फक्त पाचजणानाच; `मिलबाट के खाओ’ला चाप बसणार कधी?

उदयसिंग पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः महापालिकेच्या विकासकामाचे नियोजन करताना हाताच्या बोटावर मोजण्याइतपत फक्त पाच ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची कामे देऊन त्यांच्यावर खास क्रुपाद्रष्टी दाखवली जाते, इतर शेकडो नोंदणीक्रत ठेकेदारांना किरकोळ कामे देऊन बोळवन केली जात असल्याचे चित्र आहे. निविदा प्रक्रिया आॅनलाईन असताना या पाच लाडक्या ठेकेदारांनाच कामे कशी मिळतात याबाबत महापालिका प्रशासनाचे मौन सारेच सांगून जाते. ‘मिलबाट के खाओ’ अशा पद्धतीतून तयार झालेल्या यंत्रणेला चाप लावण्याची वेळ आली आहे. त्यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी खमकी भूमिका घेण्याची अपेक्षा आहे.

तीन कन्स्ट्रक्शन कंपनी व स्वतःच्या नावाने काम भरणारे दोघे महापालिकेचे `लाडके’ ठेकेदार असल्याचे त्यांना मिळणाऱ्या कामांवरून दिसते. त्यांच्या कामाची यादी पाहिली तर काहींकडे प्रमाणापेक्षा जास्त कामे असल्याचे दिसून येत असल्याने निविदा प्रक्रियेचाच संशय येत आहे.

स्वनिधी तसेच शासनाकडून येणाऱ्या मूलभूत सेवासुविधांसाठी, दलितवस्ती सुधारणा, दलितेत्तर वस्ती सुधारणा अशा निधीची कामे महापालिकेतून केली जातात. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते. पण ज्यांनी कामे केली आहेत त्यांची यादी पाहिल्यानंतर ‘खरच'' या प्रक्रियेनुसार कामे दिली जात आहेत का? याचा संशय आहे. त्या ठेकेदारांमध्ये ‘गणेश'' कृपा असणारा, कुठे चर्चेत न करता गुपचूप काम करणारा, ‘गावकी‘ गाजविणारा पाटील, मोठी बोलाबाला करत निर्मिती’ करणारा, ‘शिव-पार्वती’च्या आशीर्वादाने पावन झालेला अशा पाच ठेकेदारांवरच महापालिकेतील रस्तेकामाचा भार असल्यासारखी स्थिती आहे.

कागदावर दिसणाऱ्या नावांव्यतिरिक्त इतर नावे प्रक्रियेत येत नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समजत नाही असे नाही. पण त्यामुळे प्रक्रियेत बदल करण्याची चर्चाही केली जात नाही. नागरिकांनी भरलेल्या कराचे पैसे व्यवस्थित वापरले जावे याची महापालिका यंत्रणेवर जबाबदारी आहे. त्यामुळे इतर निविदा भरतच नाहीत का? त्यांना भरू दिले जात नाही का? त्यासाठी काय केले जाते याचा शोध घेऊन त्यात बदल करायला हवेत. त्यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असायला लागते. रस्ते कामाची तपासणी करायला लावल्यानंतर तयार केलेल्या यादीमुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना ही बाब खटकली. त्याच आता अटकाव करू शकतात.
.................
माझा भाग नव्हे शहर बघा
लोकप्रतिनिधींना प्रभागातून निवडून दिले जाते. ते पुढील निवडणुकीची तयारी म्हणून आपल्या भागातील रस्ते कसे चकचकीत होतील हे पाहतात. पण प्रभागाच्या हद्दीवरील रस्त्यांकडे ढुंकूनही पहात नाहीत. पण हे फक्त प्रभागाचे नव्हे शहराचे विश्वस्त असल्याचा विसर पडला आहे. काहीजण प्रभागातील नावे टाकून शासनाकडून निधी मंजूर करून आणतात. त्याचे श्रेय त्यांना घ्यायचे असेल तर घेऊ द्या, पण जे रस्ते करणे गरजेचे आहेत, त्यासाठी प्रशासनाला स्वनिधी वापरण्याची मोकळीक द्यायला हवी. त्यानंतर जर रस्त्यांची अवस्था खराब झाली तर गय करायची नाही हे धोरण ठरवायला हवे.
(समाप्त)