पर्यटन मालिका भाग ८ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन मालिका भाग ८
पर्यटन मालिका भाग ८

पर्यटन मालिका भाग ८

sakal_logo
By

पर्यटनाचा खेळखंडोबा ः भाग ८
-----

सात तालुक्यांतील सुविधांना खीळच
अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून मर्यादेपलीकडे प्रयत्न नाहीतच

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी कोट्यवधीचा निधी आणावा, केंद्र व राज्य सरकारकडून वाटा मिळावा, ही अपेक्षा गैर नाही. काही लाखांत सुरक्षेच्या सुविधा, प्रेक्षणीय स्थळांची स्वच्छता केली आणि निसर्गाचे रूप ‘जैसे थे’ ठेवून येथे कमी खर्चात राज्यात असंख्य पर्यटनस्थळे विकसित झाली आहेत. त्याच धर्तीवर कोल्हापुरात पर्यटन विकास करता येणे शक्य आहे.
पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन विकासावर बैठकीत चर्चा केली. काही प्रमाणात निधी आणून ठराविक ठिकाणांचा विकासही केला. हा अपवाद सोडला तर जिल्ह्यातील अन्य सात तालुक्यांतील पर्यटन विकासाला खीळच बसली आहे.
सात वर्षांपूर्वी सिंहस्तपर्व कालासाठी लाखो भाविक नृसिंहवाडीला येणार म्हणून जवळपास शंभर कोटींचा निधी आला. नृसिंहवाडी धार्मिक स्थळाचा विकास व्हावा म्हणून नदी घाट बांधला, सुशोभीकरण, विद्युतीकरण केले. पुढे त्या सोहळ्याला भाविकांचा जेमतेम प्रतिसाद लाभला तरी तेथे कायमस्वरूपी सुविधा झाल्या. त्याचा लाभ भाविकांसाठी आजही जरूर होत आहे. अशा प्रकारे निधी आणून त्याचा विनियोग जिल्ह्यातील अन्य डोंगरी, जंगली तालुक्यातील पर्यटनपूरक सुविधांसाठी व्हावा.
लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वरसारख्या छोट्या तालुक्यांत पर्यटकांचा बारमाही प्रतिसाद लाभतो. तेथील घराघरांत पर्यटन उलाढालीतील पैसा जातो. लोकांना रोजगार मिळून त्यांचं जगणं सुसह्य होतं. हा पुरावा असूनही त्यावर अभ्यास केला, कोल्हापुरातील पन्नासभर गावांत पर्यटन होऊ शकेल अशा मुद्यांवर चर्चा केली, असा प्रयत्न ना आमदारांनी केला, ना जिल्हाधिकाऱ्यांनी केला. पर्यटनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी एका मर्यादेपलीकडे फारसे प्रयत्नच झाले नाहीत.

चौकट
‘आडवाटेचे कोल्हापूर’ उपक्रम यशस्वी
तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘आडवाटेचे कोल्हापूर’ या उपक्रम यशस्वी केला; मात्र अपवाद वगळता अन्य आमदारांनी असा प्रयत्न त्यांच्या मतदारसंघात केल्याचे दिसत नाही. या उलट मोठा निधी, मोठी कामे, निविदा, कंत्राटदार अशा तांत्रिक बाबींचा बागुलबुवा उभा करत अखेर निधीची वाट बघत कोल्हापूरच्या पर्यटनांचा बोजवारा उडाला.

चौकट
लोकप्रतिनिधींना एवढे तरी जमेल का?
जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, हातकणंगले, आजरा, चंदगड या सात तालुक्यांत डोंगर, दऱ्या, जंगल, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, निसर्ग आहे. यात कोणतेही बांधकाम अथवा बदल न करणे, स्वच्छतागृह उभारणे, त्याच गावातील लोकांच्या घरात, पडीक जागेत, निवासांची (होम स्टे) सुविधा करणे, त्या गावातच ग्रामीण खाद्य पदार्थांचे जेवण, नाष्ट्याची सुविधा करणे, पर्यटनपूरक व्यवसायासाठी कर्ज देणे,
परराज्यातील पर्यटकांपर्यंत मार्केटिंग करणे, या गोष्टी केल्यास पर्यटकांचा प्रतिसाद वाढू शकेल.