ग्रामपंचायत निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूक

sakal_logo
By

जिल्ह्यात ४७५ ग्रामपंचायतींत निवडणुकीचा धुरळा
---
१८ डिसेंबरला मतदान; २८ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सात हजार ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २८ नोव्हेंबरपासून या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल; तर १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी २० डिसेंबरला होईल.
कोरोनामुळे लांबलेल्या व सदस्यांची मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच झाल्या आहेत. तथापि, नोव्हेंबर, डिसेंबरअखेर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या विद्यमान सभागृहाची मुदत संपत आहे. अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमायचा की निवडणुका घ्यायच्या याविषयी राज्य निवडणूक आयोगात चर्चा सुरू होती. अखेर या दोन महिन्यांत मुदत संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील ४२९, तर डिसेंबरमध्ये ४५ ग्रामपंचायतींच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ संपत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ या दोन महिन्यांत संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला. करवीर तालुक्यातील वडणगे, पाचगाव, उचगाव, कळंबा या मोठ्या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे २०२२ ही अर्हता तारीख निश्‍चित करण्यात आली. त्यामुळे या दिवशी मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.
विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. राज्यात सत्तांत्तर झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील बाळासाहेब ठाकरे शिवसेना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्‍वाखालील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार असला, तरी जिल्ह्यातील वर्चस्वात दोन्ही काँग्रेसच वरचढ ठरण्याची शक्यता आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना व दोन्ही काँग्रेस यांची युतीही शक्य आहे.
..............
निवडणुकीचा कार्यक्रम असा ः
१८ नोव्हेंबर- अधिसूचना प्रसिद्ध
२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर- उमेदवारी अर्ज दाखल करणे
५ डिसेंबर- उमेदवारी अर्जांची छाननी
७ डिसेंबर- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस
१८ डिसेंबर- मतदान
२० डिसेंबर- मतमोजणी
....................
जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
करवीर- ५३, कागल- २६, पन्हाळा- ५०, शाहूवाडी- ४९, हातकणंगले- ३९, शिरोळ- १७, राधानगरी- ६६, गगनबावडा- २१, गडहिंग्लज- ३४, आजरा- ३६, भुदरगड- ४४, चंदगड- ४०.
............