ठाकरे ब्रँड वर आपण विद्यापीठ निवडणूक जिंकू ः वरूण देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे ब्रँड वर आपण विद्यापीठ निवडणूक जिंकू ः वरूण देसाई
ठाकरे ब्रँड वर आपण विद्यापीठ निवडणूक जिंकू ः वरूण देसाई

ठाकरे ब्रँड वर आपण विद्यापीठ निवडणूक जिंकू ः वरूण देसाई

sakal_logo
By

फोटो
....

‘ठाकरे ब्रँड’ वर विद्यापीठ निवडणूक जिंकू

युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचा विश्वास
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीत विरोधकांकडे पैसे, नोंदणी, संस्था चालक सर्व काही आहे. पण आपल्याकडे ‘ठाकरे ब्रँड’ आहे. समाजातील सुशिक्षित वर्ग उद्धव ठाकरे यांना मानतो. या ब्रँडच्या जोरावर आपले सर्व उमेदवार निवडून येतील. फक्त प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत आपली भूमिका पोहचली पाहीजे. मतदार आपली वाट बघत असून आपला विजय नक्की आहे, असा विश्वास युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या शिव-शाहू आघाडीच्या पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते.
प्रास्ताविक सुनील मोदी यांनी केले. या वेळी ‘सुटा’चे कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील म्हणाले, ‘‘प्राध्यापक भरती, नव शैक्षणिक धोरणाला विरोध, विद्यार्थी निधीचा योग्य विनियोग हे मुद्दे घेऊन आपण निवडणूक लढवत आहोत. सुटाचे प्राध्यापक पदवीधरला देखील मतदान करणार आहेत. त्यामुळे शिव-शाहू आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे.’’
गिरीश फोंडे म्हणाले, ‘‘आपल्या आघाडीचे उमेदवार हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहूंच्या विचारांचे पाईक आहेत. आपण रस्त्यावरची लढाई करणारे आहोत. आता अधिसभेत विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करायचा आहे.’’ शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे- पाटील म्हणाले, ‘‘राज्याच्या विकासामध्ये विद्यापीठांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे विद्यापीठांचे संचालन करणाऱ्या अधिसभेमध्ये बुद्धीवादी लोक जाणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जर अधिकाधिक पदवीधरांचे मतदान करवून घेतले तर आपला विजय निश्चित आहे.’’
या वेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, रविकिरण इंगवले, मनजित माने, श्वेता परुळेकर यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.
------

काँग्रेसची भूमिका अशी का?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत आहेत. ही भाजप विरोधातील यात्रा असून त्याला शिवसेना, राष्ट्रवादी यांनी पाठिंबा दिला आहे. असे असताना कोल्हापुरात मात्र विद्यापीठ निवडणुकीत काँग्रेस भाजपबरोबर जात आहे. असे का? हे पदवीधरांपर्यंत पोहचवा, असे वरुण सरदेसाई म्हणाले.