‘कागल’ उत्साही, ‘चंदगड’ला हवे चिंतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कागल’ उत्साही, ‘चंदगड’ला हवे चिंतन
‘कागल’ उत्साही, ‘चंदगड’ला हवे चिंतन

‘कागल’ उत्साही, ‘चंदगड’ला हवे चिंतन

sakal_logo
By

61371
हसन मुश्रीफ, राजेश पाटील

‘कागल’ उत्साही, ‘चंदगड’ला हवे चिंतन
राष्ट्रवादी पक्षाची अवस्था; गावागावांतील पक्ष संघटनेची फळी मजबुतीचे आव्हान
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : ‘गोडसाखर’ निवडणुकीतील विजयाने कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज शहर, गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते चार्ज झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. याउलट चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीला पराभवाचे चिंतन करुन संघटनेची फळी आणखीन मजबूत करण्याचे आव्हान आहे. आगामी विधानसभेसाठी आमदार राजेश पाटील यांना चंदगड मतदारसंघात आतापासूनच पक्ष संघटन पातळीवर काम करावे लागणार आहे.
सध्या राष्ट्रवादी नेत्यांच्यामध्येच दोन गट आहेत. कागलमध्ये मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी एकसंघ आहे. चंदगड मतदारसंघात मात्र माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व आमदार राजेश पाटील यांच्यातील गटबाजी उफाळली आहे. या प्रकाराने आता गंभीर वळण घेतल्याची झलक गोडसाखर निवडणुकीत पहायला मिळाली. कुपेकर गट मुश्रीफ यांच्यासोबत राहिला, तर आमदार पाटील विरोधी आघाडीचे प्रमुख राहिले. निवडणुकीपेक्षा एकाच पक्षाच्या मुश्रीफ-पाटील यांच्यातील लढाई राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरली. यात मुश्रीफ यांनी बाजी मारली, तर पाटील यांना पराभावाला सामोरे जावे लागले.
या निकालाने कागल मतदारसंघातील गडहिंग्लज शहर व गिजवणे जि. प. गटातील राष्ट्रवादी चार्ज झाली आहे. पुढील निवडणुकांसाठी त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. गडहिंग्लज पालिका जिंकण्यासाठीही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यादृष्टीनेच त्यांनी गोडसाखरची तयारी केली होती, हे निकालानंतर स्पष्ट झाले. याउलट चंदगड मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या दुफळीमुळे पक्षाचे नुकसान होत आहे. कुपेकर गटाचे एकेक कार्यकर्ते मुश्रीफांच्या साथीला जात आहेत. गोडसाखरच्या निकालावर त्याचे काय परिणाम झाले, हे तालुक्याने पाहिले. आता पक्षाच्या एकसंघतेसाठी चंदगडमधील प्रमुखांना चिंतन करावे लागणार आहे. त्यात आमदार पाटील यांनाच पुढाकार घेण्याची गरज आहे.
कै. कुपेकरांच्या प्रत्येक निवडणुकीत पडद्यामागची स्ट्रॅटेजी राबविणारे मजूर संघाचे माजी अध्यक्ष उदय जोशी व आमदार पाटील यांच्यात विधानसभा निवडणुकीनंतर मोठा दुरावा निर्माण झाला आहे. आमदार पाटील यांच्या विरोधात चंदगड विधानसभेची निवडणूक लढविलेले अप्पी पाटील व संग्राम कुपेकर यांना गोडसाखर निवडणुकीसाठी जोशींच्या मध्यस्थीने मुश्रीफ यांनी आपल्याकडे वळविल्याची चर्चा आहे. श्रीमती कुपेकर, संग्राम कुपेकर व अप्पी यांच्या एकत्र येण्याने महागाव-नेसरी भागातील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ही गटबाजी कायम राहिल्यास पुन्हा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीलाच अधिक धोका असल्याचे जाणकारांचे मत आहे.
----------------
चौकट
...तर बालेकिल्ल्याची ओळख पुसेल!
गोडसाखर निकालाच्या अनुभवानंतर तरी गावागावांतील पक्ष संघटनेची दुरुस्ती होणार का, असा प्रश्‍न पडला आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये पक्षातील ही बेदिली चंदगड मतदारसंघात कायम राहिली, तर दोघांचे भांडण, तिसऱ्याला लाभ अशीच अवस्था होण्याची भिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याची ओळख कधी पुसून जाईल, हे कळणारसुद्धा नाही अशी एकनिष्ठ सामान्य कार्यकर्त्यांची भावना तयार झाली आहे.