गाव काबीज करण्यास कारभारी सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाव काबीज करण्यास कारभारी सज्ज
गाव काबीज करण्यास कारभारी सज्ज

गाव काबीज करण्यास कारभारी सज्ज

sakal_logo
By

गाव काबीज करण्यास कारभारी सज्ज
ग्रामपंचायत निवडणुका; गडहिंग्लज तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आज आयोगाने जाहीर केला. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गावची ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी गावकारभारी सज्ज झाले आहेत. गोडसाखरच्या रणधुमाळीनंतर आता गावागावांत पुन्हा एकदा निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. तालुक्यातील मोठ्या गावांचा यात समावेश असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे.
भडगाव, बड्याचीवाडी, नेसरी, जखेवाडी, कौलगे, बेकनाळ, कडगाव, महागाव, हरळी खुर्द, करंबळी, हसूरवाडी, हिडदुग्गी, कडाल, बटकणंगले, वैरागवाडी, कडलगे, येणेचवंडी, कळवीकट्टे, कुंबळहाळ, हसूरसासगिरी, सरोळी, काळामवाडी, डोणेवाडी, हडलगे, बिद्रेवाडी, तारेवाडी, यमेहट्टी, कुमरी, शिप्पूर तर्फ नेसरी, सांबरे, तावरेवाडी, हिटणी, मुगळी या गावांची निवडणूक या टप्प्यात होणार आहे. नुकताच गोडसाखर निवडणुकीचे रणांगण पार पडले आहे. या निवडणुकीतून बाहेर पडताच गावागावांतील प्रमुख राजकीय कारभाऱ्यां‍ना ग्रामपंचायत निवडणुकीचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. त्यासाठी उमेदवारी चाचपणीसाठी धावपळ उडणार आहे.
गावच्या सत्ता केंद्रावर आपलाच झेंडा लावण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोडणीला लागणार आहेत. विशेष करून ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या राजकारणाला महत्त्‍व नसते. स्थानिक आघाड्यांचे राजकारण रंगलेले असते. यामुळे सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून गावच्या राजकारणात फारसे लक्ष घालत नाही. भविष्यातील निवडणुकांसाठी दोन्ही गट त्यांना आपलेच मानावे लागतात. यामुळे सोयीनुसार निवडणूक लढविण्याच्या सूचना नेतेमंडळीसुद्धा देत असतात. या निवडणूक टप्प्यात भडगाव, नेसरी, कौलगे, कडगाव, महागाव, करंबळी, मुगळी, बटकणंगले, कडलगे, हिटणी आदी मोठ्या गावांचा समावेश असल्याने राजकारण तापणार आहे. महागाव येथील पाटील व पताडे गट हे एकमेकांचे विरोधक गोडसाखर निवडणुकीत एकाच आघाडीच्या छताखाली आले होते. आता ग्रामपंचायत निवडणुकीत दोघांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा ग्रामीण राजकारण ढवळून निघणार आहे. गोडसाखर निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात कार्यरत असणारे गावामधील दोन-तीन गट आता ग्रामपंचायत निवडणुकांना कसे सामोरे जातात, याचीही उत्सुकता आहे.
--------------
चौकट
उमेदवारीसाठी पाच दिवस
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर असे केवळ पाच दिवस आहेत. ऑनलाईन उमेदवारी भरावयाची असल्याने इच्छुकांची धावपळ उडणार आहे. ५ डिसेंबरला छाननी असून त्यानंतर दोनच दिवस माघारीसाठी आहेत. बिनविरोधसाठी प्रयत्न करणार्‍या गावांतील प्रमुखांना कालावधी अत्यंत तोकडा असल्याचे सांगितले जात आहे.