वीज बील थकबाकी रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज बील थकबाकी रद्द करा
वीज बील थकबाकी रद्द करा

वीज बील थकबाकी रद्द करा

sakal_logo
By

61414
--------

वीजबिल थकबाकी रद्द करा
---
मुख्यमंत्र्यांकडून सूचना; २७ एचपीवरील यंत्रमागधारक
इचलकरंजी, ता. ९ ः राज्यातील २७ एचपीवरील यंत्रमागधारकांच्या वीजबिलातील एकूण १४० कोटींची थकबाकी रद्द करण्याबाबतच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव वीरेंद्रसिंह यांना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच संबंधित यंत्रमागधारकांच्या वीजबिलातून पोकळ थकबाकीचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली. या निर्णयानंतर शहरातील यंत्रमागधारकांच्या वीजबिलातून तब्बल ५० कोटींची पोकळ थकबाकी रद्द होणार आहे.
या प्रश्नाबाबत यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन चर्चा केली. खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या उपस्थितीत त्यांनी हे निवेदन सादर केले. सूरज दुबे, भाऊसो आवळे, झाकीर भालदार आदी उपस्थित होते. याबाबत वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.
राज्यातील २७ एचपीवरील लघुदाब यंत्रमागधारकांना वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सक्ती तत्कालीन शासनाने केली होती. पण, ही नोंदणी प्रक्रिया किचकट असल्याने अनेक यंत्रमागधारकांची नोंदणी झाली नाही. त्यामुळे गत डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांसाठी वीज सवलत बंद केली. त्यानंतर ही सवलत पूर्ववत केली. पण, या दोन महिन्यांतील पोकळ थकबाकी आजही संबंधित यंत्रमागधारकांच्या वीजबिलात येत आहे. त्यामुळे ‘महावितरण’कडून वीज कनेक्शन तोडण्याची भीती यंत्रमागधारकांना सतावत आहे.
या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी याप्रश्नी निवेदन देऊन चर्चा केली. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव वीरेंद्रसिंह यांना दिले. याशिवाय, पाच टक्के व्याज अनुदानाच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगाच्या नागपूर विभागाकडे प्रलंबित असलेले असे प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविले जाणार आहेत. त्याच्या मंजुरीनंतर साध्या व अत्याधुनिक यंत्रमागधारकांना मोठा लाभ मिळणार आहे.
--------------
अतिरिक्त वीज सवलतीची मागणी
२७ एचपीवरील यंत्रमागधारकांना जाहीर केलेली ७५ पैशांची अतिरिक्त वीज सवलत लागू करावी, तसेच साध्या यंत्रमागधारकांनाही स्पर्धेत टिकण्यासाठी प्रतियुनिट एक रुपया अतिरिक्त सवलत देण्याची मागणीही या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबतही मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.