शहराच्या दारात सात गव्यांचा कळप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहराच्या दारात सात गव्यांचा कळप
शहराच्या दारात सात गव्यांचा कळप

शहराच्या दारात सात गव्यांचा कळप

sakal_logo
By

शहराच्या दारात सात गव्यांचा कळप
नागाळा पार्क परिसरातील शेतवडीत मुक्काम; वनविभाग सतर्क

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः गेल्या वर्षी हिवाळ्यात शहरात आलेल्या गव्याच्या कळपाने एकाच बळी घेतला होता. ही घटना अद्याप विस्मृतीत गेली नसताना आज पुन्हा शहरात सात गव्यांचा कळप आढळला आहे. नागाळा पार्क परिसरासमोरील शेतवडीत सायंकाळी गवे दिसले. वनविभागाने पंचगंगा नदीच्या दिशेने त्या गव्यांना हसुकावून लावले. मात्र, रात्री उशिरापर्यंत गव्यांचा वावर नदीकाठच्या शेतीत होता.

सायंकाळी नागाळा पार्क पेट्रोल पंपामागील शेतीत काहींना दोन गवे दिसले. त्यानंतर अर्ध्या तासात विन्स हॉस्पिटलसमोरील शेतीत आणखी दोन गवे दिसले. याची माहिती वनविभागाला मिळताच वन कर्मचाऱ्यांचे एक बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत गवे शेतीत गडप झाले होते. त्यानंतर वनविभागाने परिसर पिंजून काढला. काही वेळात त्यांना गव्यांच्या कळपच आढळला. या कळपाला नदीकडेने परतीच्या मार्गाने घालविण्यासाठी पथकाने प्रयत्न केले. मात्र, गवे नदीकाठच्या शेतवडीत घुसले. तोपर्यंत अंधार पडल्याने गव्यांचा माग काढता येणे अशक्य झाले. तरीही वनविभागाने जादा कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. तीन पथके करून ती गव्यांच्या मार्गावर नियुक्ती केली. गवे शहरात घुसून काही दुर्घटना होऊ नये, यासाठी गव्यांना परत त्यांच्या अधिवासात जाण्याचा मार्ग काढून देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. करवीर वनपाल विजय पाटील यांच्यासह विभागाचे २५ कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत.

पाच वर्षांत आठव्यांदा आले गवे
गेल्या पाच वर्षांत कोल्हापुरात आठ वेळा गवे आले. सुरुवातीला दोन वर्षात एक- दोन गवे येत होते. गेल्या वर्षी मात्र चार गव्यांचा कळप आला होता. लक्षतीर्थ वसाहतपर्यंत आलेला गव्यांचा कळप हणमंतवाडी, शिंगणापूरमार्गे पुढे निघून गेला. त्यानंतर पुढील महिन्यात तीन गवे आले. त्यांनी पंचगंगा नदीकाठच्या शेतीतून चक्क शहरातील मुख्य मार्गावरून येत जवळपास दहा गल्ल्या व शहराच्या मुख्य मार्गावर फेरफटका मारला होता. दोन गवे, भुयेवाडी परिसरातील शेतीत गेले होते. तेथे गर्दी झाली. शेतवडीत एका गव्याने तरुणांवर हल्ला केला. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटना ताज्या असताना पुन्हा यंदा सात गव्यांचा कळप आल्याने वनविभाग अधिक सतर्क झाला आहे.