सतरा गावात पोचला संसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतरा गावात पोचला संसर्ग
सतरा गावात पोचला संसर्ग

सतरा गावात पोचला संसर्ग

sakal_logo
By

सतरा गावात पोचला संसर्ग
लम्पीचा धोका वाढतोय : गडहिंग्लजला पाच मृत्यू, ४५ जनावरे बाधित
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : लम्पी स्कीन आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गडहिंग्लज तालुक्यात आतापर्यंत ४५ जनावरे बाधित झाली आहेत. यातील पाच बैलांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर चार जनावरे बरी झाली असून उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. तालुक्याच्या १७ गावांमध्ये लम्पीने हातपाय पसरले आहेत. त्यामुळे पशुपालकांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. अन्यथा धोका वाढण्याची शक्यता आहे.
लम्पी स्कीन या नव्याने उद्‍भवलेल्या आजाराने गायवर्ग जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात गडहिंग्लज तालुक्यात फारसा संसर्ग नव्हता. मात्र, गेल्या पंधरवड्यात संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. हनिमनाळमधील बैलांना सर्वात प्रथम लागण झाली. त्यानंतर एक-एक करीत आतापर्यंत १७ गावात संसर्ग पोहोचला आहे. गडहिंग्लज शहरासह बड्याचीवाडी, वडरगे, मुगळी, हेब्बाळ कसबा नूल, बुगडीकट्टी, मांगनूर तर्फ सावतवाडी, कडगाव, बिद्रेवाडी, बसर्गे, येणेचवंडी, भडगाव, हिटणी, औरनाळ, शेंद्री, हसुरचंपू या गावातील ४५ जनावरांना लागण झाली आहे. यात २४ गायी तर २१ बैलांचा समावेश आहे. यातील बड्याचीवाडीचे तीन, वडरगे व बिद्रेवाडी येथील प्रत्येकी एका बैलाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत मृत झालेले सर्व बैल आहेत. चार जनावरांचा उपचारानंतर आजार बरा झाला आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून लागण झालेल्या ३६ जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. मुळात लम्पीची लागण झाल्यामुळे फुफ्‍फुसाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे आयव्ही लावणे अडचणीचे ठरते. अशा परिस्थितीत तोंडावाटे औषध देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र, जनावरांना तोंडावाटे औषधे देणे जिकिरीचे बनत आहे. त्यासाठी पशुवैद्यकांची कसोटी लागत आहे. तोंडात गाठी उठल्यामुळे जनावरे वैरण खाण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्याचा परिणाम प्रकृतीवर होताना दिसत आहे. परिणामी, प्रकृती कमजोर असलेली जनावरे लम्पीला बळी पडत आहेत.
------------
* पशुपालकांची जबाबदारी वाढली...
लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण मोहीम हाती घेतली. युद्धपातळीवर गायवर्ग जनावरांचे लसीकरण केले. मात्र, त्यानंतरही जनावरांना लम्पीची लागण होत आहे. अगदी मृत झालेल्या बैलांचेही लसीकरण झालेले होते. अशा परिस्थितीत पशुपालकांची जबाबदारी वाढत आहे. लम्पीची लागण होणार नाही याची खबरदारी घेणे त्यांच्यासाठी महत्त्‍वाचे बनले आहे.