नेत्यांची झाली सोय, गावपुढाऱ्यांची गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेत्यांची झाली सोय, गावपुढाऱ्यांची गैरसोय
नेत्यांची झाली सोय, गावपुढाऱ्यांची गैरसोय

नेत्यांची झाली सोय, गावपुढाऱ्यांची गैरसोय

sakal_logo
By

नेत्यांची झाली सोय, गावपुढाऱ्यांची गैरसोय
‘गोडसाखर’नंतर ग्रामपंचायतींचे धूमशान : राजकीय भूमिका बदलण्याचे आव्हान
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोवर ग्रामपंचायत निवडणुकांचे धूमशान सुरू झाले आहे. गोडसाखर निवडणुकीत विजयापर्यंत पोचण्यासाठी नेत्यांनी आपल्या सोईनुसार आघाड्यांची रचना केली होती. मात्र, आता हीच बाब ग्रामपंचायत निवडणुकीत गावपुढाऱ्यांना गैरसोयीची ठरण्याची शक्यता आहे.
गोडसाखरेच्या प्रचारात एकत्र फिरलेल्या गावपुढाऱ्यांना ग्रामपंचायतीसाठी ऐक्य कायम ठेवणे अडचणीचे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंधरवड्यातच राजकीय भूमिका बदलण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. गडहिंग्लज साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीसाठी छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडी आणि काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडीत दुरंगी लढत झाली होती. आघाड्यांच्या रचनेत अपवाद वगळता सर्वच पक्षांना फुटीचे ग्रहण लागल्याचे दिसून आले. परस्पर विरोधात असणारे पक्ष-गटही ‘गोडसाखर’साठी एकाच आघाडीत आले होते. गावपातळीवरील कार्यकर्त्यांत फारसे सख्य नसले तरी नेत्यांनी आघाडी केल्यामुळे त्यांना एकत्र नांदण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. त्यामुळे गोडसाखरच्या प्रचारात परस्परविरोधी पक्ष-आघाडीचे कार्यकर्ते एकत्र फिरताना दिसले होते.
दरम्यान, गोडसाखर निवडणुकीचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाही. इतक्यात गडहिंग्लज तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुका स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून लढल्या जातात. गोडसाखरसाठी झालेल्या आघाड्या तालुका पातळीवरील होत्या. तिच परिस्थिती गावपातळीवर राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांना भूमिका बदलावी लागणार आहे. सध्याच्या काळात राजकीय भूमिका बदलणे तशी नवी बाब राहिलेली नाही. मात्र, गोडसाखर आणि ग्रामपंचायत निवडणुकांतील कालावधी अगदीच कमी आहे, ही त्यांच्यासाठी अडचणीची गोष्ट ठरणार आहे. मुळात गोडसाखरसाठी एकत्र आलेल्या गावपुढाऱ्यांना पाहून मतदार अचंबित झाले होते. आता ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना पुन्हा विरोधात लढताना पाहून मतदारांना पुन्हा धक्का बसू शकतो.
------------------
* चाणाक्ष आधीच सावध
गोडसाखर निवडणुकीसाठी एकत्र येणे भविष्यात स्थानिक राजकारणासाठी अडचणीचे ठरू शकते ही बाब काही चाणाक्ष गावपुढाऱ्यांनी हेरली होती. त्यामुळे सावध होत त्यांनी गावात गोडसाखरचा प्रचार एकत्र करणे टाळले होते. एकाच आघाडीचा वेगवेगळा प्रचार करताना ते दिसले होते. त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय भूमिका बदलणे फार अडचणीचे ठरणार नसल्याचे दिसते.