दोन उड्डाणपूल प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन उड्डाणपूल प्रस्ताव
दोन उड्डाणपूल प्रस्ताव

दोन उड्डाणपूल प्रस्ताव

sakal_logo
By

शहरात दोन उड्डाणपुल
रंकाळा टॉवर, परीख पुलाजवळ उभारणी; सर्व्हे पुर्ण, वाहतुकाची कोंडी फुटणार
कोल्हापूर, ता. १० : रंकाळा टॉवर येथे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व परीख पुलासाठी पर्याय म्हणून या दोन्ही ठिकाणी महापालिकेने उड्डाणपुलाचे प्राथमिक प्रस्ताव तयार केले आहेत. वाहतूक सर्व्हेही झाला असून महापालिका प्रशासन ते अंतिम करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवणार आहे. याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
शहरातील वाढत्या वाहनांमुळे विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. त्यातील गगनबावड्याकडून शहरात येणाऱ्या रस्त्यावर रंकाळा तलावापासून महापालिकेपर्यंत वाहनांची प्रचंड गर्दी असते. सकाळी व सायंकाळी, तर रंकाळा टॉवर येथील चौकात हमखास वाहने थांबलेली असतात. रस्ता अरूंद असल्याने वाहतूक कोंडी होते. सकाळी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची तर सायंकाळी शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्यांची गर्दी असते. त्यातच बहुतांश पर्यटकही याच रस्त्यावरून रंकाळा तलावावर येत असतात. त्यामुळे रंकाळा टॉवरजवळ होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांशिवाय पर्याय नसतो.
‍पालकमंत्री केसरकर यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत रंकाळा रस्त्यासाठी तसेच परीख पुलासाठी उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार महापालिकेचे सल्लागार संदीप गुरव यांनी दोन्ही ठिकाणचे उड्डाणपुलाचे प्रस्ताव तयार केले आहेत. अंतिम प्रस्ताव तयार करण्यासाठी महापालिकेने त्या रस्त्यावरील वाहतुकीचा सर्व्हेही केला आहे. परीख पुलासाठी यापूर्वी दोन आराखडे तयार केले होते. त्यात एक भुयारी मार्ग व दुसरा पूल नुतनीकरणाचा समावेश होता. रेल्वेकडे हे प्रस्ताव सादर केल्यानंतर भुयारी मार्गाचा प्रस्ताव मान्य करून त्याबाबत तांत्रिक अहवाल सादर करण्यापर्यंत चर्चा झाली होती. पालकमंत्र्यांच्या बैठकीत येथे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव समोर आला. पालकमंत्र्यांच्या आदेशामुळे दोन्ही ठिकाणी उड्डाण पूल उभे करण्यासाठी महापालिका प्रयत्न करू लागली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही बैठक घेऊन महापालिकेने तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
------------------
चौकट
पावणेदोन किलोमीटर लांबीचा पूल
पापाची तिकटी ते रंकाळा चौपाटी दरम्यान १२ मीटरचा रस्ता आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभा करून त्यावर पाच मीटर रुंदीचा रस्ता बनवण्याचा प्रस्ताव आहे. या पुलाची लांबी पावणेदोन किलोमीटर आहे. तसेच राजारामपुरी जनता बझार चौक ते दाभोळकर कॉर्नरपर्यंतही उड्डाणपूल बनवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर चार मीटर रुंदीचे दोन रस्ते असे दुहेरी मार्ग केले जाणार आहेत. गुरव यांनी बनवलेल्या प्रस्तावाला महापालिका प्रशासन अंतिम स्वरूप देत आहे. त्यानंतर ते मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येतील. ते मंजूर झाल्यानंतर त्याचे डीपीआर बनवून ते निश्‍चित केले जातील.
--------------
महापालिकेचा अभ्यास
शहरात येण्यासाठी तसेच कोकणाकडे जाणाऱ्यांसाठी प्रमुख मार्ग असलेल्या ताराराणी चौक ते दसरा चौकपर्यंतच्या रस्त्यावर उड्डाण पूल करता येईल का याचा यापूर्वी महापालिकेने अभ्यास केला होता. त्याबाबत महापालिकेने पुढे फारसे केलेले नाही. या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ आहे. त्यासाठी हा मुद्दा चर्चेला आला होता.